Lok Sabha Election 2024: लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असताना महायुतीतील घटक पक्षांत जागावाटपावरून खल सुरू आहे. विशेष बाब म्हणजे, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थित बैठक होऊनही जागावाटपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. आज ११ तारखेच्या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब होण्याचीही शक्यता आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्ली वारी करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.शुक्रवारी रात्री (ता.८) महायुतीच्या जागावाटपाबाबत अमित शहांच्या दरबारी जवळपास दोन तास खलबंत रंगली. जागावाटपाच्या मुद्द्यावर तुटेपर्यंत न ताणण्याची तयारी भाजपकडून दाखवण्यात आली आहे. मात्र, अजूनही शिंदे आणि पवार गटांना अपेक्षित तेवढ्या जागा देण्यात भाजपने तयारी दर्शवली नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार,आज मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. कदाचित आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीचे ही शेवटची मंत्रिमंडळ बैठक असेल त्यानंतर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. प्रफुल्ल पटेल तसेच अन्य नेते बैठकीसाठी दिल्लीला रवाना होणार आहेत.
महायुतीमध्ये तीन ते चार जागांवर एकमत होत नसल्याचे सांगितले जात आहे. आज होणार्या बैठकीत या जागांवर एकमत होण्याची शयता वर्तविण्यात येत आहे. त्यानंतर महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटेल, असे सांगण्यात येत आहे.