Ahmednagar Crime: सोशल मीडियावर केलेली चॅटींग व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने अल्पवयीन मुलीकडून सुमारे ११ तोळ्यांचे दागिने व रोकड असा सात लाख १० हजार रुपयांचा ऐवज लुटणार्या तरूणाला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. रेहान राजु शेख (रा. तपोवन रस्ता, सावेडी) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, त्याने मुलीकडून घेतलेले सोने बँकेत ठेवले असल्याची माहिती दिली आहे.
अल्पवयीन मुलगी (वय १३) क्लासला जात असताना एका मेकॅनिक दुकानात काम करत असलेला मेकॅनिक रेहाने तिचा पाठलाग करत जाळ्यात अडकवले. दोन ते तीन महिन्यांपासून ते सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या माध्यमातून चॅटींग केली. सप्टेंबर रोजी सायंकाळी रेहान याने मुलीला ‘माझी आई आजारी आहे, माझ्या घरी कोणी नाही, तु तुझ्या वडिलांना न सांगता मला पैसे दे, तु मला पैसे दिले नाही तर तुझी व माझी इंस्टाग्राम चॅटींग मी तुझ्या आई- वडिलांना पाठविल’ अशी धमकी दिली होती. धमकीला घाबरून पीडिताने वडिलांच्या मोबाईलवरून रेहानला पैसे पाठविले.
त्यानंतर देखील त्याने पीडितेकडे वारंवार पैशाची मागणी केली असता तिने यु. पी. आय व्दारे त्याला पैसे पाठविले होते. त्याने पीडितेच्या आईचे घरातील सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली असता पीडिताने तिच्या आईचे कपाटात ठेवलेले आठ तोळ्यांचे गंठण, एक तोळ्याचे टॉप्स, पाच ग्रॅमची अंगठी, तीन ग्रॅमच्या तीन नथा, पाच ग्रॅमचे दोरा गंठण तसेच पाच ग्रॅमची चेन असे सुमारे ११ तोळ्यांचे सोन्याचे दागिने रुमालात बांधून घराच्या बालकनीतून रेहानला दिले होते.
दरम्यान पीडित मुलीच्या वडिलांनी त्यांच्या मोबाईलच्या फोन पे मधील ट्रांजेक्शन व घरातील कपाटाची चावी सापडत नसल्याने त्यांनी पत्नी व मुलीकडे चौकशी केल्यानंतर मुलीने याबाबत कबूली देत रेहान कडून धमकी दिली जात असल्याने त्याला पैसे पाठविले व घरातील दागिने दिले असल्याची कबूली दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी सदरचा प्रकार गुरूवारी दुपारी तोफखाना पोलिसांना सांगितला. पोलिसांनी रेहान शेख विरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने रेहान शेख याचा शोध घेत त्याला अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करत आहेत.