spot_img
ब्रेकिंग'महाराष्ट्र केसरी' साठी महेंद्र गायकवाड, विशाल बनकर, पृथ्वीराज मोहोळ, शिवराज राक्षे, सुदर्शन...

‘महाराष्ट्र केसरी’ साठी महेंद्र गायकवाड, विशाल बनकर, पृथ्वीराज मोहोळ, शिवराज राक्षे, सुदर्शन कोतकरची आगेकूच

spot_img

तर माऊली जमदाडे, बाला रफिक शेख, हर्षवर्धन सदगीर, हर्षद कोकाटे या दिग्गजांचे आव्हान संपुष्टात
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
महाराष्ट्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी दोन्ही सत्रातील उत्कंठावर्धक लढतींनी कुस्ती शौकीनांची मने जिंकली. महाराष्ट्र केसरी किताबासाठी मल्लांच्या युद्धास प्रारंभ झाला आहे. चैतन्यमयी वातावरणात शुक्रवारी झालेल्या कुस्त्यांनी उपस्थित हजारो नागरिकांचे डोळ्यांचे पारणे फेडले. रोमहर्षक व अतितटीच्या कुस्त्यांना नागरिक टाळ्या व शिट्यांनी दाद देत होते. अनेक दिग्गज मल्ल एकमेकांना भिडत वेगवेगळे डाव टाकत प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवत होते.


माती विभागात महाराष्ट्र केसरीचे प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या महेंद्र गायकवाड, संदीप मोटे, वेताळ शेळके, विशाल बनकर, अनिकेत मांगडे, आकाश रानवडे तसेच गादी विभागात महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे,, पृथ्वीराज मोहोळ यांच्यासह अहिल्यानगरच्या सुदर्शन कोतकर यांनी प्रतिस्पर्ध्याला असमान दाखवत आगेकूच केली. तर महाराष्ट्र केसरी बाला शेख, हर्षवर्धन सदगीर, ज्ञानेश्वर जमदाडे, हर्षद कोकाटे, शुभम शिंदनाळे, श्रीमंत भोसले, नरेश म्हात्रे, गणेश कुकुते, अभिमन्यू फुले, भरत कराड, रमेश बहिरवाल, वैभव माने या दिग्गजांचे आव्हान शुक्रवारी संपुष्टात आले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्ती शौकिनांचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतींना शुक्रवारी सायंकाळी सुरुवात झाली. या लढती पहाण्यासाठी अहिल्यानगरासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने कुस्ती शौकीन दाखल होते. राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस व स्पर्धेचे आयोजक आ.संग्राम जगताप यांच्यासह राज्यातून आलेले नावाजलेले मल्ल, राजकीय पक्षाचे नेते यांच्या उपस्थितीत महत्वाच्या कुस्त्या लावण्यात आल्या.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने व अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि आमदार संग्रामभैया जगताप सोशल फाउंडेशनच्या वतीने अहिल्या नगर येथील स्व. बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरी, वाडीया पार्क येथे सुरू असलेल्या ६७ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शुक्रवारी तिसऱ्या दिवशीच्या सकाळ व सायंकाळच्या सत्रात माती व गादी विभागातील ५७, ८६ , ६१, ७९ , ६५, ७४, ९२ आणि महाराष्ट्र केसरी (८६ ते १२५ ) किलो वजनी गटातील काही गटातील गतविजेत्यांना अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागले. तर काहींनी धक्कादायक निकालाची नोंद करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला.

माती विभागात महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या सोलापूरचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत एकेरी व दुहेरी पटांच्या डावांवर निर्धारित वेळेत ५-० गुणांने कोल्हापूरच्या शुभम शिंदनाळेचा पराभव केला. तर सांगलीच्या संदीप मोटे याने साताऱ्याच्या गणेश कुकुते याचा ६-०, सोलापूरच्या विशाल बनकर व अमरावतीच्या ज्ञानेश्वर जमदाडे यांच्यात अत्यंत प्रेक्षणीय लढतीत विशाल बनकरने ७-० अशी निर्णायक आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल केली. दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने कोल्हापूरच्या श्रीमंत भोसले याचा १०-० अशा गुणाधिक्यांनी पराभव करत विजयी सलामी देणाऱ्या महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरची विजयी घोडदौड पुढच्या फेरीत विशाल बनकरने रोखली कुस्तीच्या निर्धारित वेळेत विशालने हि लढत ८-२ अशी जिंकत उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला.

महाराष्ट्र केसरी व वाशिमचे प्रतिनिधी करणाऱ्या बाला शेखने हिंगोलीच्या नितीन खंडेलवालचा १०- ० अशा गुणाधिक्यांनी पराभव करत पुढच्या फेरीत धडक मारली होती. परंतु पुढच्या फेरीत सोलापूरच्या वेताळ शेळके याच्या बरोबर झालेल्या लढतीत बालारफिक शेखच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर पडला तर वेताळ शेळके याचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश झाला.

गादी विभागात महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या पुण्याचा नवोदित मल्ल पृथ्वीराज मोहोळ याने जालन्याच्या जगदीश चारावडेचा १०-० अशा गुणाधिक्यांनी पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. तर नांदेडचे प्रतिनिधित्व करणारा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पुणे शहराचे प्रतिनिधित्व करणारा हर्षद कोकाटे यांच्यात लढत झाली. हि लढत अत्यंत चुरशीची होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र धिप्पाड शरीरयष्टी व बलदंड शिवराज राक्षे याने सुरुवातीलाच आक्रमकता दाखवत ही लढत ११-० अशी जिंकत विजयी अश्वमेध सुरू ठेवला.

स्पर्धेचे संयोजक आ.संग्राम जगताप यांचे क्रीडा नगरीत आगमन झाल्यावर त्यांचे जल्लोषात वाजंत्रीच्या तालात स्वागत करण्यात आले. यावेळी उत्साही कार्यकत्यांनी त्यांना खांद्यावर घेत वाजतगाजत माती व गादी आखाड्यांवर मिरवले. तसेच कुस्तीगीर संघाचे राज्याध्यक्ष माजी खासदार रामदास तडस यांचेही जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने उत्साहात स्वागत सत्कार करण्यात आला.

शुक्रवारी महाराष्ट्र केसरी स्पर्धतील बलाढ्य मल्लांच्या कुस्त्या होणार असल्याने त्या पहाण्यासाठी कुस्ती शौकीनांनी वाडियापार्क मैदानावर मोठी गर्दी केली होते. डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पुण्याचा हर्षद कोकाटे यांच्यातील लक्षवेधी लढतीच्या वेळी नागरिकांनी आखाड्या भोवती गर्दी केल्याने आ.संग्राम जगताप स्वतः गर्दी हटवण्यासाठी खाली उतरले. झालेली गर्दी नियंत्रणात आल्यावर ही कुस्ती सुरु झाली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वाळू तस्करीतून पारनेरमध्ये गुन्हेगारीचा कहर; पोलिसांची गुन्हेगारांसोबत पार्टनरशिप?

भ्रष्ट पोलिसांच्या आश्रयाने गुन्हेगार बिनधास्त! वाळू तस्करीच्या वादात युवकाला मारहाण, फक्त एकाला अटक; पोलिसांची...

हार्दिकला मोठा झटका, शुभमन गिलकडे मोठी जबाबदारी

आशिया कपसाठी सूर्याच्या शिलेदारांची निवड नगर सह्याद्री वेब टीम - आशिया चषकासाठी भारतीय संघाची आज घोषणा...

बंदुकीच्या धाकाने पत्नीला मारहाण

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड येथील सागर हॉटेलजवळ राहणाऱ्या स्नेहल निखिल शेकडे...

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी, कर्मचारी बेमुदत संपावर; कारण काय?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालयात सन 2005 पासून कंत्राटी पद्धतीने काम...