spot_img
अहमदनगरजिल्ह्यात महायुतीला सर्वाधिक जागा! दोन अपक्ष बाजी मारणार

जिल्ह्यात महायुतीला सर्वाधिक जागा! दोन अपक्ष बाजी मारणार

spot_img

महायुती 7, मविआ 3 तर 2 अपक्ष बाजी मारणार!
नगर शहरात कमालीची उत्सुकता | श्रीगोंदा, शेवगावमध्ये अपक्षांनी मारलेली बाजी निर्णायक ठरणार
सारिपाट | शिवाजी शिर्के
लोकसभा निवडणुकीच्या निकालात मतांची जी समिकरणे लागू पडली तीच समिकरणे विधानसभा निकालात देखील लागू पडणार हे स्पष्टपणे समोर आले आहे. मतांचा वाढलेला टक्का काहींसाठी चिंतेचा तर काही ठिकाणी घटलेला टक्का काहींसाठी चिंतेचा विषय ठरलाय. झालेल्या लढती, झालेले मतदान याचा विचार करता नगर जिल्ह्यातील 12 जागांपैकी भाजपा महायुतीला 7, महाविकास आघाडीला 3 जागा मिळण्याचा अंदाज आहे. श्रीगोंद्यातून राहुल जगताप हे अपक्ष उमेदवार जिंकू शकत असल्याचा अंदाज कायम आहे. येथे विक्रमसिंह पाचपुते यांचा करिष्मा चालला तरच पाचपुते बाजी मारतील. शेवगाव- पाथडतून सुरुवातीला प्रताप ढाकणे यांच्यासाठी चांगले वातावरण असतना शेवटच्या टप्प्यात ही लढाई राजळे विरुद्ध घुले अशीच रंगली. शेवटच्या दोन दिवसात अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले यांनी खेळलेली चाल यशस्वी झाल्याचे दिसते आणि त्यातूनच त्यांनी तेथून बाजी मारलेली दिसल्यास आश्चर्य वाटू नये!

मुस्लिम, माळी, ख्रिश्चन अन्‌‍ केडगावकरांची भूमिका निर्णायक!
नगर शहरात अजित पवार गटाचे उमेदवार विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी निवडणूक जाहीर होण्याच्या खूप आधीपासून प्रचारात बाजी मारली. त्यांच्या विरोधात कोण हे मतदान पंधरा दिवसांवर आले तरी ठरत नव्हते. त्याचा फायदा उचलत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी अटोकाट प्रयत्न केला. संग्राम जगताप यांनी केलेली विकास कामे जनतेसमोर मांडली. मात्र, असे असताना त्यांच्या विरोधात सुप्त लाट कायम राहिली. पंधरा दिवसात उमेदवारी ठरुन देखील अभिषेक कळमकर यांनी यंत्रणा उभी केली. महाविकास आघाडीतील सर्वांनीच त्यांना साथ दिली. याशिवाय मुस्लिम, माळी, व्यापारी, ख्रिश्चन, दलित मतदार मोठ्या प्रमाणात कळमकर यांच्या बाजूने झुकलेला दिसत असताना केडगाव उपनगरात कोतकरांनी जगताप विरोधी धार तीव्र केली. त्याचाही परिणाम मतदानाच्या दरम्यान जाणवला. संग्राम जगताप यांच्याबद्दल चांगले बोलणारा मतदार त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करत होता. जगताप यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना आवर घालण्याचे काम करता आले नाही अशी खंतही अनेकांनी बोलून दाखवली. या मतदारसंघात मतदान कसे झाले याहीपेक्षा मतदारांनी बुथमध्ये जाऊन सुप्त लाटेत बटन कोणाचे दाबले यावरच निकाल अवलंबून असणार आहे. एकतर्फी वाटणारी, लाखाच्या मताधिक्याने बोलली जाणारी निवडणूक चार आकड्यातील मताधिक्याचा निकाल देऊन जाऊ शकते अशी परिस्थीती आहे.

एका घरात दोन पदे या मुद्यावरच झाले मतदान!
प्र्रस्थापितांच्या विरोधात लढणाऱ्या लंके यांनी गत विधानसभा आणि काल परवाची लोकसभाही त्याच मुद्यावर जिंकली. मात्र, यावेळी विधानसभेसाठी स्वत:च्या पत्नीला उमेदवारी घेणाऱ्या लंके यांच्यावरच मतदारांनी घराणेशाहीचा आरोप केला अणि तशी चर्चाही घराघरात झाली. माजी आमदार विजय औटी यांना लंके यांनीच उभे केल्याची चर्चा झडली! यानंतर औटी यांच्या बाजूने गेलेल्या मतदारांनी काशिनाथ दाते यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. विजू औटी या युवकाने माघार घेत दाते यांना पाठींबा दिला. यानंतर निवडणुक दाते यांच्या बाजूने झुकली. शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले यांची बंडखोरी खा. लंके यांनी थांबविणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी कार्ले यांना थोपविण्यापेक्षा त्यांच्या विरोधात टोमणे मारले. ग्रामपंचायतीला देखील कार्ले याला निवडून येऊ देणार नाही अशी भाषा लंके व त्यांच्या समर्थकांनी सुरू केली आणि त्यातूनच कार्ले यांनी माघार न घेण्याची भूमिका घेतली. कार्ले यांना मिळणारी मते लंके यांचे मताधिक्य कमी करणारी ठरणार आहेत. नगर तालुक्यातील गावांमधून संदेश कार्ले यांनी 30 हजारांपेक्षा जास्त मते घेतल्यास लंके यांची विजयाची वाट बिकट होऊ शकते. दाते आणि लंके या दोघांकडूनही दुष्काळी समजल्या जाणाऱ्या पारनेर तालुक्यात ‌‘पाऊस‌’ पाडला! लक्ष्मीदर्शन जाहीरपणे झाल्याने निकाल मोठ्या मताधिक्याचा राहणार नाही हे नक्की!

विकला न जाणारा चेहरा म्हणून राहुल जगताप राहिले चर्चेत!
निवङणूक जाहीर झाली आणि राहुल जगताप यांचे नाव चर्चेत आले. उमेदवारी अंतिम मानली जात असताना ही जागाच शिवसेनेने घेतली. त्यातही निष्ठावान शिवसैनिकाला उमेदवारी देताना नाकारुन दोन तास आधी पक्षात आलेल्या नागवडे यांना उमेदवारी जाहीर केली गेली. मविआतील राष्ट्रवादीसह काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना अंधारात ठेवले गेले आणि त्यातून व्हायचा तो परिपाक झाला. नागवडे हे शिवसेनेचे उमेदवार असताना त्यांच्यासाठी मतदानाच्या दिवसापर्यंत त्यांच्याच शिवसेनेसह काँग्रेस- राष्ट्रवादी शरद पवार गटातील एकही पदाधिकारी सक्रिय दिसला नाही. भाजपाचे विक्रम पाचपुते यांनी मोठा गाजावाज टाळत यंत्रणा राबवली. अत्यंत संयमी भूमिका घेत ते प्रक्रियेला सामोरे गेले. त्यातून या निवडणुकीत नागवडे हे चर्चेत देखील आले नाही. जगताप विरुद्ध पाचपुते अशीच निवडणुक असल्याचे दिसून येते. राहुल जगताप यांना पक्षातून निलंबीत करण्यात येऊनही त्यांच्यासाठी राष्ट्रवादीसह राज्यातील अन्य पक्षांतील नेत्यांनी मदतीचीच नव्हे तर रसद पुरविण्याची भूमिका घेतली.

पाऊस पडूनही विरोधी वातावरण कायम
कर्जत जामखेड मतदारसंघात रोहीत पवार हे पहिल्यापासूनच पिछाडीवर राहिले. शेवटच्या दिवशी प्रचाराची सांगता सभा शरद पवार यांना घ्यावी लागली यातच त्यांचा पराभव आहे. मतदारसंघात त्यांच्या विरोधात वातावरण नाही असे एकही गाव दिसले नाही. मतदानाला जाताना देखील त्यांच्या विरोधात मतदार जाहीरपणे टोमणे मारताना दिसला. दुसरीकडे राम शिंदे यांनी अत्यंत संयमी भूमिका घेतली आणि भुमिपुत्राच्या भूमिकेत येऊन यंत्रणा राबवली. पैशांचा पाऊस पडला नाही अस या मतदारसंघात एकही गाव नाही. मात्र, इतके सारे केल्यानंतरही रोहीत पवार यांच्या विरोधातील वातावरण मतदान होईपर्यंत निवळलेले दिसले नाही.

राहुरीत कोणकोणाला धोबीपछाड देणार?
राहुरी मतदारसंघात दोन माजी राज्यमंत्री एकमेकांच्या विरोधात होते. प्राजक्त तनपुरे यांनी राहुरीतील दहशतीचा मुद्दा समोर आणला आणि त्यावर चर्चा झडत असतानाच माजी खासदार प्रसाद तनपुरे यांची दमबाजी करणारी ऑडीओ क्लीप बाहेर आली आणि निवडणुकीतील दहशतीचा मुद्दा संपला. कर्डिले यांनी नेटके नियोजन करताना तनपुरे यांना पुरते घेरले. मात्र, तनपुरे यांच्या बाजूने देखील यावेळी आक्रमक भूमिका राहिली. राहुरी तालुक्यातून तनपुरे यांना मोठे मताधिक्य मिळाले तरच ते तरु शकतात. नगर आणि पाथड तालुक्यातील गावांवर कर्डिले यांनी लक्ष केंद्रीत केले होते आणि जोडीला राहुरीत ‌‘करो या मरो‌’ची घेतलेली भूमिका घेतली. या मतदारसंघाचा निकाल पाच- दहा हजारांचा असेल असेच वातावरण आहे.

संगमनेर, शिडचे गड राखले जातील!
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्यात विखे पाटलांना यश आले. सुजत विखे यांनी मतदारसंघात लक्ष घातले आणि त्यातून थोरातांना यावेळी मोठा संघर्ष करावा लागला. येथून बाळासाहेब थोरात विजयी होणार असले तरी त्यांना अपेक्षीत असणारे, त्यांच्याकडून दावा केला जाणारे मताधिक्य त्यांना मिळणार नाही अशीच परिस्थिती आहे. दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटलांना घेरण्याचा प्रयत्न होऊन देखील त्यांचा विजय नक्की मानला जात आहे. सुजय विखे पाटलांनी येथे ठोकलेले तळ आणि युवकांचे केलेले संघटन कामी येणार!

कोपरगावमध्ये काळे तर नेवाशात गडाखच!
कोपरगावमध्ये आशुतोष काळे हे अजित पवार गटाचे उमेदवार! त्यांच्याविरोधात संदीप वर्पे हा नवखा तरुण शरद पवार गटाकडून देण्यात आला. कोल्हे यांनी माघार घेतल्यानंतरही या मतदारसंघात संदीप वर्पे यांनी चांगली लढत दिली. कोल्हे हे काळे यांच्यासाठी सक्रिय असताना त्यांचे समर्थक पडद्याआड काय भूमिका घेतात हे मतमोजणीनंतरच समोर येणार आहे. मात्र, काहीही असले तरी येथून आशुतोष काळे हे बाजी मारण्याची शक्यता अधिक आहे. नेवासा मतदारसंघात तिरंगी लढत शंकरराव गडाख यांच्या पथ्यावर पडू शकते. बाळासाहेब मुरकुटे यांनी शेवटच्या टप्प्यात चांगले वातावरण तयार केले. विठ्ठलराव लंघे यांच्यासाठी मोठी रसद आली. गडाख यांनी तिरंगी लढत असताना नेटके नियोजन केले. प्रशांत गडाख यांची या निवडणुकीतील उणिव संपूर्ण यंत्रणेला जाणवली असली तरी त्यांची उणिव भासणार नाही याची खबरदारी साऱ्यांनीच घेतली.

अकोले- श्रीरामपूरमध्ये काटे कि टक्कर!
अकोल्यातून महायुतीच्या किरण लहामटे यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून अमित भांगरे यांची उमेदवारी होती. स्व. अशोक भांगरे यांच्या प्रती असणारी सहानुभूती आणि शरद पवार यांनी तयार केलेले वातावरण भांगरे यांच्यासाठी फायद्याचेच ठरले. मात्र, दुसरीकडे अपक्ष उमेदवारी ठेवलेल्या वैभव पिचड यांनी प्रचंड ताकद लावली आणि त्यातूनच अजित पवार गटाचे किरण लहामटे हे मागे पडल्याचे शेवटी दिसून आले. भांगरे आणि पिचड यांच्यात येथे निकराची लढाई झाल्याचे शेवटी दिसून आले. श्रीरामपूरमध्ये कांबळे यांनी सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यात ते फारसे यशस्वी होतील असे वाटत नाही. अजित पवार गटाचे लहू कानडे यांनी गेल्या पाच वर्षात केलेली कामे आणि त्यातून वाढवलेला संपर्क ही त्यांची जमेची बाजू ठरली. काँग्रेसच्या हेमंत ओगले यांनाही येथे चांगले वातावरण दिसून आले. मात्र, अपक्ष उमेदवार बेग यांनी अंतिम टप्प्यात प्रचारात आणि यंत्रणेत आघाडी घेतल्याने येथे देखील निकराचीच लढाई झाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडी पिछाडीवर; महायुतीचे ‘हे’ उमेदवार आघाडीवर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्र कुणाचा? महायुती की महाविकास आघाडी? सत्तेत कोण आणि विरोधी बाकावर...

विजयाच्या उंबरठ्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया; सुजयने माझ्यासाठी..

राहता । नगर सहयाद्री:- माझा विजय मतदारसंघातील जनतेला समर्पित आहेत. सुजयने माझ्यासाठी खूप मेहनत घेतली....

अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीचा पहिला विजय! राधाकृष्ण विखे पाटील यांनी मारली बाजी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षांच्या फुटी नंतर...

Election Results 2024 LIVE : अहिल्यानगरमध्ये कोण बाजी मारणार! जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातील लढती? पाहा….

Election Results 2024 LIVE: महाराष्ट्र कुणाचा? महायुती की महाविकास आघाडी? सत्तेत कोण आणि विरोधी...