अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगरजवळील निंबळक-विळद बायपास रस्त्यावर शनिवारी सकाळी घडलेल्या दुर्घटनेत पाच वर्षीय चिमुरडीचा ट्रकच्या चाकाखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला. सोनाली नागनाथ बांदल (वय ५, रा. मोरया पार्क, एमआयडीसी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे.
सदरची दुर्दैवी घटना पेट्रोल पंपासमोर घडली. सोनालीचे वडील नागनाथ बांदल हे पत्नी आणि मुलीसह पेट्रोल पंपाजवळ आले होते. त्यांनी दुचाकी पार्क करताना मुलीला रस्त्याच्या कडेला उभे केले होते. त्याचवेळी त्या ठिकाणी उभ्या असलेल्या ट्रक (क्र. एचआर 61 सी 0870) मागे कोणी आहे की नाही याची खातरजमा न करता ट्रक रिव्हर्स घेतला. या अपघातात सोनालीचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी चांगदेव गोवर्धन आढाव (वय ३३, रा. पिंपळगाव उजैनी, ता. अहिल्यानगर) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रक चालक सतीषकुमार गुलाबसिंग रेपासिंग रेपारी (वय २३, रा. भिलडाना, जि. फतेहाबाद) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, निष्काळजीपणामुळे एका निरागस जीवाचा बळी गेल्याची भावना व्यक्त होत आहे. अधिक तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.