पारनेर | नगर सह्याद्री
लोकसभेसाठी समोरचा उमेदवार कोणी असो सर्वसामान्य जनतेसाठी ’अहमदनगर’ ची जागा आपणच लढविणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. नीलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांनी केली. एकीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन दिवसीय चिंतन शिबीर शिर्डी येथे सुरु असतानाच काल (४ जानेवारी) राणीताई यांनी लोकसभेचे रणशिंग फुंकले. भाजपचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याचे जाहिर केल्याने महायुतीला तडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिवराज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आमदार नीलेश लंके यांच्या पुढाकाराने शिवस्वराज्य यात्रा बुधवारी सुरू करण्यात आली आहे. श्रीक्षेत्र मोहटा देवी येथे महापूजा करून शिवस्वराज्य यात्रेस सुरवात झाली. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणीताई लंके यांनी ही घोषणा केली. यावेळी नीलेश लंके प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष कारभारी पोटघन, मेजर दौलत गांगड, विपुल सावंत, उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रफिक शेख, माजी नगरसेवक चांद मणियार महादेव दहिफळे, महेश दौंड, अर्जुन धायतडक, उबेद आतार, दीपक म्हासाळकर, आम आदमी पक्षाचे किसन आव्हाड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाकडून आ.शंकरराव गडाख, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून आ. रोहित पवार व आ.प्राजक्त तनपुरे आदी नावाची चर्चा सुरु असतानाच महायुती सरकारमधील अजित पवार गटाचे आ. नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंकेंनी लोकसभा निवडणुकीत एन्ट्री घेतली. राणी लंके यांनी स्वतः नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
लोकसभेला समोर कुणीही उमेदवार असला तरी त्याचे आम्हाला काही घेणे देणे नाही. मात्र मी जनतेच्या विकासासाठी लोकसभा निवडणूक लढणार आहे असे राणी लंके म्हणाल्या. कारभारी पोटघन म्हणाले, अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील सहाही तालुक्यांतील प्रत्येक गावात शिवस्वराज्य यात्रा जाईल. आचारसंहिता लागली नाही तर संपूर्ण जिल्ह्यात ही यात्रा आम्ही नेणार आहोत. आमदार नीलेश लंके किंवा राणी लंके हे लोकसभा निवडणूक लढविणार आहेत, हे निश्चित झाल्याचे पोटघन यांनी सांगितले.
नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने शिवस्वराज्य यात्रा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवरायांचे कार्य घराघरात पोहोचविण्यासाठी आ. नीलेश लंके प्रतिष्ठानमार्फत शिवस्वराज्य यात्रा काढली असून अहमदनगर लोकसभा मतदार संघातील प्रत्येक गावात जाणार आहे. या यात्रेचा प्रारंभ मोहटागडावर (ता.पाथर्डी) बुधवारी (दि.३ जानेवारी) झाला. यात्रेचा समारोप नगर येथे १५ जानेवारीला आ. लंके यांच्या उपस्थितीत होईल अशी माहिती कारभारी पोटघन यांनी दिली.
खा. सुजय विखेंपुढे अनेक आव्हाने
अहमदनगर लोकसभेसाठी डॉ.सुजय विखे पाटील यांनी तयारी सुरु केली असून प्रवरा यंत्रणाही कामाला लागली आहे. परंतु ही निवडणूक विखेंना सोपी नाही असेच चित्र दिसत आहे. कर्जत जामखेडचे भाजपचे विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे यांनी देखील खासदारकीला उभे राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यात विखे व शिंदे यांचे अंतर्गत शीतयुद्ध देखील लपून राहिलेलं नाही. शिंदेंनी विखेंचे विरोधक कोल्हे व नीलेश लंके यांच्याशी जवळीक केल्याने राजकीय अडचण निर्माण झाली आहे. त्यात खासदार विखेंना टक्कर देईल असा उमेदवार विरोधी पक्षांकडून शोधला जात आहे. जागावाटपात दक्षिण मतदारसंघ भाजपकडेच राहिल असं दिसत आहे. अशा परिस्थितीत आता राणीताई लंके यांनीही निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिल्याने नवी समीकरणे तयार होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.