नाशिक । नगर सहयाद्री:-
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. मात्र, तो नाशिकमध्ये दिसल्याचा स्थानिकांचा दावा आहे. गंगापूर रोडवरील दत्त मंदिर चौकात त्याला पाहिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, सकाळी साडेनऊच्या सुमारास कृष्णा आंधळे एका काळ्या दुचाकीवरून एका साथीदारासोबत दत्त मंदिर परिसरात दिसला. काही क्षणानंतर त्याने चेहऱ्यावरील मास्क काढला आणि लगेचच तो ओळखला गेला. प्रत्यक्षदर्शी अॅड. गितेश बनकर यांनी पोलिसांना तातडीने माहिती दिली, मात्र तो मकवानाबादच्या दिशेने पसार झाला.
या घटनेनंतर पोलिसांनी गंगापूर रोड परिसरातील CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. कृष्णा आंधळे नक्की कोणत्या वेळी आला आणि किती वेळ थांबला, याचा शोध घेतला जात आहे. गंगापूर पोलिसांनी तातडीने तीन पथके रवाना केली असून, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या वर्णनाच्या आधारे मोटारसायकल आणि व्यक्ती शोधण्याचे काम सुरू आहे.
CCTV फुटेजच्या आधारे तपास करण्यात येत आहे आणि लवकरच ठोस पुरावे मिळतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून, पोलिस आता कृष्णा आंधळेच्या अटकेसाठी मोठी मोहीम राबवत आहेत.