अहमदनगर। नगर सहयाद्री
देवदर्शनासाठी गेलेल्या व्यापारी कुटुंबाचे घर फोडून चार लाखाची रोकड, सहा लाख १८ हजार ७५० रूपयांचे सोन्याचे दागिने, ३० हजाराचे चांदीचे दागिने असा एकुण १० लाख ४८ हजार ७५० रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. ३ मार्च रोजी दुपारी १२ ते ६ मार्च रोजी केडगाव उपनगरातील मोहिनीनगरच्या शिक्षक कॉलनीत ही घटना घडली.
याप्रकरणी काल, गुरूवारी व्यापारी जितेश राजेंद्र बलदोटा (वय २७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व त्यांची पत्नी ३ मार्च रोजी दुपारी १२ वाजता देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते.
जाताना त्यांनी घराला कुलूप लावले होते. त्यानंतर चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली चार लाखाची रोकड, सुमारे १४ तोळे सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने असा ऐजव चोरून नेला.
सदरचा प्रकार ६ मार्च रोजी सायंकाळी फिर्यादीचा मोहिनीनगरमध्ये राहणार्या भावाच्या लक्ष्यात आल्याने त्यांनी फिर्यादीला माहिती दिली. फिर्यादी व त्यांची पत्नी रात्री नऊच्या सुमारास घरी आल्यानंतर याबाबतची माहिती कोतवाली पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी डॉग स्कॉड, फिंगर प्रिंट पथकासह घटनास्थळी भेट दिली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.