मुंबई । नगर सहयाद्री:-
छत्र्या-रेनकोट पुन्हा गुंडाळून ठेवा! कारण हवामान विभागाने स्पष्ट केलंय की मान्सूनने मुंबईतून अधिकृतपणे एक्झिट घेतली आहे. आता पुढील दोन ते तीन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रातूनही मान्सून माघारी जाणार आहे. शुक्रवारी मान्सूनने मुंबईसह गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांतून काढता पाय घेतला आहे.
पाच अथवा सहा तारखेला मान्सून राज्यातून माघार घेईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण आठवडाभराच्या उशीराने मान्सूनने परतीच्या प्रवासाला सुरूवात केली. शुक्रवारी मान्सूनने गुजरातसह महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांतून एक्झिट घेतल्याचे IMD कडून जाहीर करण्यात आलेय. अंदाजित वेळेपेक्षा मान्सूनने मुंबईतून उशिरा काढता पाय घेतला असला तरी सात वर्षांतील ही सर्वात लवकर माघार आहे. तर २००६ नंतर २० वर्षातील ही दुसऱ्यांदा सर्वात लवकर माघार आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या शक्ती चक्रीवादळामुळे मान्सूनचा मुक्काम वाढला होता. मुंबईतून मान्सूनच्या एक्झिटची सामान्य तारीख ८ होती. गेल्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये तुरळक ठिकाणी पावसाने हजरे लावली. मंगळवारपासून मुंबई आणि उपनगरात पावसाने विश्रांती घेतली. शुक्रवारी पावसाने मुंबईतून काढता पाय घेतला. मागील सात वर्षातील ही सर्वात लवकर माघार ठरली आहे. २०२४ मध्ये १५ ऑक्टोबरला मान्सूनने मुंबईतून माघार घेतली होती. २०२३ आणि २०२२ मध्ये मान्सून दोन आठवड्यापेक्षा जास्त उशिराने मान्सून माघारी परतला होता.
यंदा मुंबई आणि महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह मुंबईतही वादळी वाऱ्यासह धो धो पाऊस कोसळला. १९५० नंतर पहिल्यांदाच मान्सूनची सर्वात लवकर सुरूवात झाली होती. जून ते सप्टेंबर, या चार महिन्यात राज्यात धो धो पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी मान्सून मुंबईतून माघारी परतलाय. दोन दिवसांत राज्यातून मान्सून माघारी परतेल, असा अंदाज आयएमडीकडून व्यक्त करण्यात आला आहे.
जाता जाता पाऊस या भागाला झोडपणार
मान्सूनचा महाराष्ट्रातील परतीचा प्रवास सुरू झाला आहे. सध्या मान्सून अलिबागपर्यंत माघारी परतलाय. पुढील दोन-तीन दिवसात राज्यातून मान्सून एक्झिट होईल. कोकण, मध्य महाराष्ट्राला परतीचा पाऊस झोडपण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस कोकण आणि मध्य माहाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर उर्वरित राज्यात हवामान स्वच्छ राहील, असे आयएमडीकडून सांगण्यात आलेय. आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आळी आहे. तर उर्वरित राज्यात पुढील चार दिवस राज्यात उघडीप असेल, असे हवामान विभागाने सांगितलेय.