spot_img
अहमदनगरविखेंची कोंडी करताना थोरातांचीच होऊ नये म्हणजे बरं!

विखेंची कोंडी करताना थोरातांचीच होऊ नये म्हणजे बरं!

spot_img

सारीपाट / शिवाजी शिर्के
नगरच्या किल्ल्याचा किल्लेदार ठरवला जाणार | लोणीत तळ ठोकला असला तरी सुजय विखेंची नजर संगमनेरकडे | संघर्ष पुढच्या पिढीतही अटळ

मतदारसंघ पुनर्रचनेसह जिल्ह्याच्या राजकारणात राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यात राजकीय संघर्ष झाला असला तरी या दोघांनीही फार टोकाची भूमिका घेतली नव्हती. मात्र, गत लोकसभा निवडणुकीपासून बाळासाहेब थोरात यांनी नगर लोकसभा मतदारसंघात लक्ष घातले आणि निलेश लंके यांच्यासाठी संगमनेरची सर्व यंत्रणा पाठवली. हीच यंत्रणा लंके यांच्या विजयासाठी निर्णायक ठरली. यानंतर सुजय विखे यांनी स्वत: संगमनेरमध्ये तळ ठोकल्यागत उमेदवारीसाठीचे संकेत दिले. थोरात यांच्या विरोधात आपण लढणार आणि जिंकून दाखवणार अशी थेट गर्जनाच त्यांनी केली. मात्र, त्यास प्रत्युत्तर देताना ‌‘बालहट्ट‌’ असा उपरोधीक टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला. जिल्ह्यात कोण कोणाविरोधात लढणार याची चर्चा रंगात आली असली तरी संगमनेरमध्ये सुजय विखे हे खरेच लढणार का याबाबत कमालीची उत्सुकता लागली आहे.

नगर जिल्ह्याच्या राजकारणात काळे- कोल्हे यांच्यातील राजकीय संघर्ष जसा सर्वश्रूत आहे तसाच संघर्ष विखे- थोरात यांच्यात देखील आहे. मात्र, संगमनेरच्या बाहेर जाऊन थोरातांनी अपवादात्मक परिस्थिती वगळता फारसे लक्ष घातले नाही. सहकारातील आणि त्यातही मुख्यत्वे जिल्हा बँकेची निवडणूक थोरात यांनी विखे यांच्या विरोधकांची मोट बांधून कायम केली. मात्र, सार्वत्रिक निवडणुकीत थोरात यांनी जाहीरपणे कधीही थेट टोकाची भूमिका घेऊन विखेंच्या विरोधात भूमिका घेतली नाही. गणेश कारखान्याच्या सार्वत्रिक निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी थेटपणे विखेंचे कट्टर विरोधक असणाऱ्या कोल्हेंना ताकद देण्याचे काम केले. अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक करत थोरात यांनी हा कारखाना कोल्हेंच्या नेतृत्वाखालील मंडळाच्या ताब्यात देण्यासाठी यंत्रणा राबवली. ही निवडणूक सुजय विखे यांनी हाताळली होती.
गणेश कारखान्याच्या निवडणुकीनंतर लागलीच लोकसभेचे वारे वाहू लागले. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांची उमेदवारी अंतिम झाल्यानंतर सुजय विखे यांच्या विरोधात संगमनेरची संपूर्ण यंत्रणा लंके यांच्यासाठी सक्रिय झाली. गावागावात संगमनेरच्या यंत्रणेचे लोक काम करत राहिले. याची कुणकुण लागताच विखे यांनी त्यांची यंत्रणा अधिक प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाळासाहेब थोरात यांच्या यंत्रणेने त्यांची चुणूक दाखवली आणि त्यांनी आखलेल्या रणनितीने नीलेश लंके यांना विजय मिळवून दिला.

लोकसभा निवडणुकीत विखे यांना पराभव पत्कारावा लागल्यानंतर सुजय विखे यांनी लोणीत तळ ठोकलाय. लोणीतील मुक्कामात सुजय विखे हे दिवसभरात शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या जोडीने संगमनेर विधानसभा मतदारसंघात लक्ष घालून आहेत. गावागावातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कामे मार्गी लावून देतानाच त्यांच्या अडीअडचणी सोडवणे आणि त्यांना सक्रिय करणे यासाठीची भूमिका सुजय विखे हे करत आहेत.

सुजय विखे हे संगमनेरमध्ये लक्ष घालत असल्याचे आणि त्यांनी संगमनेरमधून लढण्याची तयारी चालवली असल्याचे समोर येताच शांत बसतील ते बाळासाहेब थोरात कसले! थोरात यांनी त्यांची यंत्रणा अधिक सक्रिय करतानाच दुसरीकडे शिड मतदारसंघातून प्रभावती घोगरे यांना ताकद देण्याचे काम केले. घोगरे यांना गणेश कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने शिड मतदारसंघातील विविध गावांमध्ये लाँच करण्यातही थोरात हेच अग्रभागी होते. सुजय विखे हे संगमनेरमध्ये लढण्याची भाषा करत असताना विखेंना शह देण्यासाठी थोरातांनी देखील कंबर कसली. त्यातूनच राजेंद्र पिपाडा यांनीही विखे यांच्या विरोधात दंड थोपटले. भाजपाकडे उमेदवारीची मागणी करणाऱ्या पिपाडा यांचा बोलविता धनी संगमनेरमध्ये असल्याचे त्यातून स्पष्टपणे समोर आले.

जिल्ह्याच्या राजकारणावर भक्कम पकड असणारे राधाकृष्ण विखे पाटील हे या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेतच. सुजय विखे हे सध्या पुर्णवेळ लोणीत तळ ठोकून आहेत. त्यातूनच त्यांनी संगमनेरमध्ये व्यक्तीगत यंत्रणा सक्रिय केली आहे. गावागावात जाऊन भेटीगाठी घेणे आणि थोरात विरोधकांची मोट बांधण्यासाठी ते सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.
‌‘बालहट्ट‌’ या शेलक्या शब्दात थोरात यांनी सुजय विखे यांच्या संभाव्य उमेदवारीची खिल्ली उडवली असली तरी सुजय विखे यांची संगमनेरमधील उमेदवारी थोरातांना गांभिर्यानेच घ्यावी लागणार आहे. थोरात यांना संगमनेरमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी सुजय विखे यांची उमेदवारी पुरेशी ठरु शकते. या निवडणुकीचा निकाल काय लागेल याहीपेक्षा या लढाईत थोरातांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

यापूव जनार्दन आहेर या नवख्या तरुणाने बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात घेतलेली मते यासाठी विचारात घ्यावी लागणार आहेत. पठार भागावर बऱ्यापैकी जनसंपर्क असणाऱ्या जनार्दन आहेर याला संगमनेर शहरासह बागायत पट्ट्यात देखील मोठी मते मिळाली होती हे विसरुन चालणार नाही. आता जनार्दन आहेर उमेदवार असतील की नाही हे येत्या दिवसात स्पष्ट होईलच! मात्र, विखेंची कोंडी करण्यास सज्ज झालेल्या थोरातांचीच कोंडी करण्यासाठी विखे यांनी डाव टाकलाय! हा डाव राज्याच्या राजकारणात निर्णायक ठरणार हे नक्की! बाळासाहेब विखे पाटील विरुद्ध भाऊसाहेब थोरात यांच्यातील संघर्षानंतर राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध बाळासाहेब थोरात हा दुसऱ्या पिढीतील संघर्ष झाला आणि होत आहे. आता त्यापुढे जाऊन तिसऱ्या पिढीतील सुजय विखे हे थोरात यांच्या विरोधात मैदानात उतरले असल्याने तिसऱ्या पिढीतील हा संघर्ष टोकाला गेलाय! या संघर्षात नगरच्या किल्ल्याचा किल्लेदार कोण हे ठरवणारी ही विधानसभा निवडणूक असणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्ह्यात महायुतीला सर्वाधिक जागा! दोन अपक्ष बाजी मारणार

महायुती 7, मविआ 3 तर 2 अपक्ष बाजी मारणार! नगर शहरात कमालीची उत्सुकता | श्रीगोंदा,...

शिरसाटवाडी मतदान केंद्रावर काय घडलं?; काय म्हणाल्या आमदार मोनिकाताईं राजळे? वाचा सविस्तर..

पाथर्डी | नगर सह्याद्री:- विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी पार पडली. आररोप प्रत्यारोप, कुठे पैशाचे...

अदानी अडचणीत; अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल; काय आहे नेमके प्रकरण?

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - उद्योगपती गौतम अदानी यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे....

CM पदाबाबत संजय राऊत यांचे मोठे विधान; थेट तारीख आणि वेळच सांगून टाकली

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : विधानसभा निडवणुकीच्या मतदानानंतर बुधवारी समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीच्या...