अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मोर्चा झाला. त्यात मंत्री छगन भुजबळ हे जणू सोटा घेऊनच उतरले होते. त्यांनी ओबीसी आरक्षण संपल्याचा घंटानाद केला. मराठा आंदोलक मनोज जरांगे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटलांवर आसूड ओढला. त्यावर आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी खणखणीत प्रतिक्रिया दिली. ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? असा रोकडा सवाल त्यांनी विचारला.
ओबीसी नेते मराठा-ओबीसी समाजात तेढ निर्माण करत असल्याचे सूतोवाच यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. दिवाळीत काहींना प्रसिद्धीचा हव्यास लागल्याचा जोरदार प्रहार त्यांनी कुणाचे नाव न घेता केला. मराठा-कुणबी जीआरमुळे ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का असा रोकडा सवाल करत त्यांनी ओबीसी नेत्यांच्या मुद्दातील हवाच काढून घेतली.
ओबीसी आरक्षणाला धक्का नाही
माझी भूमिका स्पष्ट करायची आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण विषय केला आहे. भुजबळ जेष्ठ नेते आहेत त्यांचा आदर करत आलो आहे. सार्वजनिक जीवनात काम करत असताना ओबीसी मराठा वातावरण वाटलं नाही. आता ५ कोर्टात जनहित याचिका दाखल झाल्या आहेत.
पुरोगामी महाराष्ट्रात सगळे एकत्र राहतात सार्वजनिक कार्यक्रम एकत्र करतात. आता दिवाळी साजरी करत आहोत ओबीसी दिवाळी आणि मराठा दिवाळी असं कधी झालं आहे का? मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं आहे की आमच्या डीएनए मधे ओबीसी आहे. त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये, असे आवाहन विखे पाटील यांनी केले.
दिवाळीनंतर ओबीसी नेत्यांसोबत बैठक घेणार
कायद्याचा चौकटीत बसवून मराठ्यवाडातील मराठा समाजाचा विषय मार्गी लावला आहे. भुजबळांना भेटणार आहे आणि त्यांना समजून सांगणार आहे. सोबत न्यायमूर्ती शिंदे यांना घेऊन जाणार आहे. ते त्यांना सगळं समजून संगतील आणि त्यांचा गैरसमज दूर केला जाईल, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
जरांगे पाटील यांनी प्रामाणिकपणे आंदोलन चालवल. त्यांनी निस्वार्थीपणे आंदोलन केलं. आम्ही जे काही केलं आहे ते कायद्याच्या चौकटीत बसवून विषय मार्गी लावला आहे. तुम्ही त्यांच शिक्षण काढत आहात हे चुकीच आहे. या पुढाऱ्याना त्यांची दिवाळी साजरी करायची आहे. दिवाळी संपल्यावर ओबीसी नेत्यांना बोलावणार आणि न्यायमूर्ती शिंदे यांना बोलवून त्यांना विषय समजून सांगतील असे त्यांनी स्पष्ट केले.
शरद पवारांवर टीका
राज्यासमोर मोठ संकट आलं होतं. ३२ हजार कोटी रुपयांच पॅकेज जाहीर केलं मग शरद पवार यांना कसली अस्वस्थता आहे. आता लोकं त्यांना मानत नाही. त्यामुळे स्वतः अस्तित्व जपण्याचा शरद पवारांचा प्रयत्न सुरू आहे.शरद पवार यांना सांगायचं आहे. आपण मुख्यमंत्री असताना कारखान्याकडून सक्तीने पैसे वसूल केले. तुम्ही वसंतदादा शुगर कडून पैसे वसूल करता मग ते तुम्हाला चालत मग सरकारने पैसे घेतले तर काय अडचण आहे, असा सवाल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांना केला. त्यांच्यावर टीका केली.