अहमदनगर। नगर सहयाद्री-
जिल्ह्यामध्ये घरफोडी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 07 घरफोडीचे गुन्हे उघड करून 5 लाख 38 हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिणे हस्तगत करण्यात आले असून आरोपीविरोधात तब्बल ७४ गुन्हे दाखल आहेत. किशोर तेजराव वायाळ ( वय 42 वर्षे, रा. मेरा ता. चिखली, जि. बुलढाणा), गोरख रघुनाथ खळेकर ( वय 37 वर्षे, रा. शिरसवाडी, ता. जि. जालना), विष्णु हरिश्चंद्र हिंगे ( वय 32 वर्षे, रा. चंदनझिरा कॉलनी, जालना) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
तोफखाना पोलीस ठाण्यात दि. २५ मे रोजी रखमा बालाजी सुंबे ( वय 57 वर्षे, अमृत कलश रेसिडेंसी, बोरुडे मळा,अहमदनगर) यांच्या राहत्या घराचे कुलुप तोंडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील 66 हजार रुपये किंमतीच्या सोन्या चांदीच्या दागिण्याचा ऐवज चोरीला गेल्याबाबत फिर्याद दाखल केली होती. वारंवार घरफोडीच्या घटना घडत असल्याने पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथकातील पो उपनि/ समाधान भाटेवाल, पोलीस अंमलदार संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, संतोष लोढे, संदीप दरंदले, संदीप चव्हाण, संतोष खैरे, प्रमोद जाधव, शिवाजी ढाकणे, अमृत आढाव, मयुर गायकवाड, मेघराज कोल्हे, चंद्रकांत कुसळकर यांना कारवाईच्या सुचना केल्या.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पथकाने घटनास्थळी भेट देवुन तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदाराच्या माध्यमातून संशयितांची माहिती मिळवली की, सदरचा गुन्हा किशोर तेजराव वायाळ ( वय 42 वर्षे, रा. मेरा ता. चिखली, जि. बुलढाणा) यांनी त्यांच्या साथीदारासह केला असून पुन्हा चोरी करण्याच्या उद्देशाने वडगांव गुप्ता येथे येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा लावुन आरोपींना गजाआड केले. त्याच्याकडे अधिक विचारपुस केली असता त्यांनी साथीदार रुद्राक्ष पवार (पुर्ण नांव माहिती नाही. रा. लाखनवाडा, ता. खामगांव, जि. बुलढाणा) याच्यासोबत केल्याची कबुली दिली आहे.
त्यांच्याकडून 07 घरफोडीचे गुन्हे उघड करून 5 लाख 38 हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिणे हस्तगत करण्यात आले असून आरोपी किशोर तेजराव वायाळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचेविरुध्द जालना, बुलढाणा, अकोला, जळगांव, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये घरफोडीचे एकुण 50 गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी नामे विष्णु हरिशचंद्र हिंगे याचेविरुध्द छ. संभाजीनगर, जालना जिल्ह्यामध्ये फसवणुक, जबरी चोरीचे एकुण 06 गुन्हे, आरोपी नामे गोरख रघुनाथ खळेकर याचेविरुध्द जालना, बीड, छ. संभाजीनगर, अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोक्का, दरोडा, जबरी चोरी, चोरी, फसवणुक व घरफोडीचे एकुण 18 गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील शेवगांव विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली आहे.