पुणे । नगर सहयाद्री-
खासगी ऑडीवर लाल दिवा लावणाऱ्या प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने एक सदस्यीय समितीची नियुक्ती केली आहे.त्यामुळे पुणे पोलिसांनंतर आता केंद्र सरकारद्वारे पूजा खेडकर यांची चौकशी होणार आहे. पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी तयार केलेला अहवाल केंद्र सरकारला पाठवण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान कार्यालयाकडून पूजा खेडकर यांचा अहवाल मागवला गेला आहे. लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनने महाराष्ट्र सरकारकडून पूजा खेडकर यांच्याबद्दल अहवाल मागवला होता. LBSNAA अहवाल तपासून अंतिम रिपोर्ट UPSC यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. या सर्व घडामोडींनंतर केंद्र सरकारने चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तयार केलेला अहवाल केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहे.
पुणे पोलिसांनी खासगी कारवर लाल दिवा लावल्याप्रकरणी पूजा खेडकर यांची चौकशी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तणुकीबाबतचा तपशीलवार अहवाल राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाला पाठवण्यात आला आहे. खासगी कारवर लाल दिवा लावणे आणि स्वतंत्र केबिनसाठी आग्रह धरल्यामुळे पूजा खेडकर चर्चेत आल्या आहेत. हा वाद आता त्यांच्या शारीरिक अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्रापर्यंत पोहोचला आहे. काल पुणे पोलिसांचे पथक त्यांच्या पाषाण येथील निवासस्थानी गेले होते, परंतु त्यांच्या बंगल्याचा गेट बंद होता. त्यांच्या आईने गेट उघडला नाही, उलट पोलिसांनाच दमदाटी केली आणि माध्यमांचे कॅमेरे फोडण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, पूजा खेडकर यांचे पुण्यातील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नॅशनल सोसायटीमध्ये आलिशान बंगला आहे. त्यांच्या बंगल्याच्या आवारात अनेक आलिशान कार आहेत. पूजा खेडकर यांनी स्वत:च्या ऑडी बेकायदेशीरपणे लाल दिवा लावला आहे. याप्रकरणी पुणे पोलिस त्यांची चौकशी करणार आहेत. त्यांनी या कारवर ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी देखील लावली आहे. मोटर वाहन नियमांनुसार त्यांच्याविरोधात कारवाई होणार आहे.