अजित पवारांबद्दल कृतघ्न झालेले लंके गावागावांतील कार्यकर्त्यांसाठी कृतज्ञ राहतील का? डॅमेज कंट्रोलचे मोठे आव्हान!
शिवाजी शिर्के। ग्राऊंड रिपोर्ट
राजकीय पक्ष आणि भूमिका यांना मुठमाती देत आपल्या विचारांचे कार्यकर्ते आणि त्यांची फळी निर्माण करण्याचे काम नीलेश लंके यांनी गेल्या पाच वर्षात केले. त्यातूनच त्यांनी राज्यभरात आपल्या प्रतिष्ठानच्या शाखा काढल्या आणि कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. धुळ्यातून आमदारकी लढवा, अशी गळ कार्यकर्ते करत असल्याची पोस्ट मध्यंतरी जशी सोशल मिडीयात आली तशीच पोस्ट आता काल- परवा आली की मावळ भागात लंके यांच्या जाहीर सभांची मागणी होतेय! खरंतर कपोलकल्पीत आणि अतिरंजक अशा या बातम्या आणि पोस्ट थांबवा हे नीलेश लंके आता सांगू शकत नाही. नव्हे अशा पोस्ट थांबवा हे सांगण्याची आवश्यकता देखील आता लंके यांना वाटत नाही! लंके यांच्या अंगात पूर्णपणे मिडीया फिव्हर चढला आहे. कोणत्याही किरकोळ घटनेची बातमी अन् न घडलेल्या घटनेची तर आणखी मोठी पोस्ट ही लंके यांची खासियत झालीय! त्यातून ते आता बाहेर पडू शकत नाहीत! शरद पवार यांना सोडून अजित पवार यांच्याकडे जाणे आणि पुन्हा अजित पवार यांना सोडून शरद पवार यांच्याकडे येण्याच्या राजकीय प्रवासात लंके यांच्याबद्दलची विश्वासार्हता कमी झाली हे नाकारुन चालणार नाही. सत्तेच्या माध्यमातून फायदा उठवेपर्यंत जे अजित पवार लंके व त्यांच्या समर्थकांना चालले तेच अजित पवार आज लंके व त्यांच्या समर्थकांनी सोशल मिडियात व्हीलन करुन टाकले आहेत. राजीनामा देताना ज्या अजित पवार यांची लंके यांनी माफी मागितली अन् माफ करण्याची विनंती केली, त्याच अजित पवार यांना आता मोदी- फडणवीस यांच्या जोडीने व्हीलन संबोधले जाऊ लागले आहे. अजित पवार यांच्या विरोधातील पोस्ट बंद करा हे सांगण्याचे धाडसही आता लंके यांच्यात राहिले नाही. अजित पवारांबद्दल कृतघ्न झालेले लंके हे गावागावातील कार्यकर्त्यांसाठी कृतज्ञ राहतील का याचीच आता शंका उपस्थित केली जात आहे.
सैराट टोळीच्या म्होरक्यापासून तालुका वाचविण्याची मागणी!
तालुक्यातील तरुणांना वेगळ्या मार्गाने नेण्याचे आणि त्यांच्या अनैतिक कामांना प्रोत्साहन देण्याचे काम होत असल्याचा आरोप गेल्या दोन- तीन वर्षांपासून होत आहेत. याशिवाय गेल्या तीन- चार वर्षातील पोलिस ठाण्यातील रेकॉर्ड तपासले तर अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे आणि त्यांच्याशी विवाह करण्याचे प्रकार वाढले आहेत. या मुलांच्या विरोधात पोलिस ठाण्या तक्रार करण्याचे धाडस कोणी करत नाही आणि कोणी धाडस केलेच तर त्या मुलीच्या घरच्यांना अथवा त्यांच्या नातेवाईकांना धमकावण्याचे प्रकारही घडले आहेत. या सर्वांच्या पाठीमागचा सुत्रधार कोण आहे हे तपासा आणि त्याच्यावरच गुन्हा दाखल करा अशी मागणी सातत्याने होत आहे. मागील महिन्यात तालुक्यातील एका स्वयंसेवी संस्थेने गृहमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात ‘सैराट टोळीच्या म्होरक्यापासून तालुका वाचवा’ अशी केलेली मागणी बरीच बोलकी ठरली आहे.
पतसंस्था बंद पाडण्यात सिंहाचा वाटा; पतसंस्थांचे पदाधिकारी, संचालक, कर्मचारी यांचे कुटुंब रस्त्यावर अन् ठेवीदार आणि त्यांचे संसार देखील!
पारनेर तालुयाच्या पठार भागातील पतसंस्था आणि ठेवीदार अडचणीत कोणी आणले याचीही चर्चा जाहीरपणे झडली. सहकारी पतसंस्था चळवळ आणि पारनेर तालुका याची वेगळी ओळख नगर जिल्ह्यात आहे. मध्यंतरी पारनेरच्या पठार भागावरील एक मोठी पतसंस्था अडचणीत आली. या पतसंस्थेला व त्या संस्थेतील पदाधिकार्यांना राजकीय आकसातून आणखी अडचणीत आणण्याचे काम झाले. पतसंस्थेचे पदाधिकारी व संस्थापक हे तालुयाच्या राजकारणात विरोधी भूमिका बजावत होते त्याचा आकसातून ही संस्था बंद कशी पडेल याची काळजी घेतली गेली. संस्था अडचणीत आहे आणि ठेवी मिळू शकणार नाहीत अशी आवई उठवली गेली त्यातून ठेवीदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि ठेवीदारांनी संस्थे समोर रांगा लावल्या. त्यातून ठेवीदारांचे पैसे देणे ही मोठी समस्या निर्माण झाली. याच दरम्यान त्याच गावातील ग्रामपंचायतीची निवडणूक लागली ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पतसंस्थेचा मुद्दा पुन्हा उचलला गेला. वास्तविक पाहता या निवडणुकीत पतसंस्था विषय यायला नको होता. हा विषय सोडून अन्य मुद्द्यावर निवडणूक करा अशी भूमिका घेणे आवश्यक असताना या संस्थेने ठेवी करा काढा अशा प्रकारची भूमिका घेतली गेली. या भूमिकेला विरोध केला गेला नाही पर्यायाने संस्था अजून गोत्यात गेली. पुढे या संस्थेच्या ठेवीदारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि ज्यांच्या इशार्यावर हे सगळं झालं त्यांनी त्याच गावच्या बाजारतळावर सभा घेतली व ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये अशी भूमिका घेतली. वास्तविक पाहता हीच भूमिका त्यांनी आधी घेतली असती तर ठेवीदार आणि संस्था वाचली असती. मात्र सर्व काही करून आपला याच्याशी काही संबंध नाही हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला. त्यातून सामान्य ठेवीदार अडचणीत आला. ही पतसंस्था बंद पडल्यानंतर अन्य पतसंस्था चालक आणि पदाधिकारी यांना धमकावणे सुरू झाले. त्यातून चार पाच पतसंस्था अडचणीत आल्या. अर्थातच त्यातून ठेवीदार देखील अडचणीत आले. तालुयातील पतसंस्था बाबत संशयाचे मळभ निर्माण करण्यात ‘सिंहाचा वाटा’ उचलून त्या संस्था, त्या संस्थांचे कर्मचारी, त्यांचे कुटुंब हे सारे यातून जसे रस्त्यावर आले तसेच ठेवीदार आणि त्यांचे संसार देखील. विकृत मनोवृत्तीतून कोणाच्या किटल्या हे सारे करत होत्या हे तालुयाला सर्वश्रुत आहे. पतसंस्थांच्या बाबतीत आडमुठी भूमिका घेत काहींचे कर्ज माफ करण्यास तर काहींची कर्ज रक्कम अवास्तव मागणीतून कमी करण्यासाठी दमबाजीची भाषा वापरली गेली हेही संस्था चालक विसरले नाहीत.
आमदारकीला ज्यांनी दिली साथ, त्यांनाच लंकेंनी हाणली लाथ!
गत विधानसभा निवडणुकीत आमदार नीलेश लंके यांना नगर -पारनेर मतदारसंघातील पण नगर तालुयातील असलेल्या गावांनी मोठ्या प्रमाणात साथ दिली. तब्बल २५ हजारांपेक्षा अधिक लीड नगर तालुयातील गावांमधून मिळाले. मात्र, लंके आमदार झाल्यानंतर त्यांनी गावोगावच्या राजकारणात लक्ष देण्यास सुरुवात केली. स्थानिक ग्रामपंचायत, सोसायट्यांच्या निवडणुकीत लक्ष घातले. परिणामी लंके यांना विधानसभेला साथ देणार्यांना त्यांचा त्रास सहन करावा लागला. स्वत:च्या निवडणुकीत प्रत्येकाचा वापर करताना यातील प्रत्येकाच्या गावात लंके यांनी जाणिवपूर्वक लक्ष घातले अन् त्या- त्या कार्यकर्त्याला त्याच्याच गावात अडचणीत आणले.
गावागावातील हस्तक्षेप अन् स्थानिक नेतृत्वांना डावलणं पडणार महागात
विजय औटी यांच्या विरोधात गावागावात जाऊन, ‘पारनेरमध्ये आल्यावर आमदार तुमच्याशी नीट बोलतो का?, तुम्हाला चहा पाजतो का?, चारचौघात अपमान केला नाही असा तुमच्या गावात कोणी आहे का?’ असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करणार्या याच लंके यांच्याबाबत आज अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तुमच्या गावात लंके यांनी ग्रामपंचायतीत लक्ष घातले का, सोसायटीत लक्ष घातले का यासह त्यांच्या प्रतिष्ठानचे कार्यकर्ते गावात कोणती भूमिका घेऊन असतात याबाबतची चौकशी आता कर्जत-जामखेड, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, राहुरी, नगर शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांकडून केली जाऊ लागली आहे. या चौकशीतून लंके व त्यांच्या समर्थकांची मिळणारी कुंडली चिंताजनक असल्याने त्याचा परिणाम देखील होऊ शकतो.
केक कापणे व गळ्यात हात घालण्यातून आमदारकी मिळाल्याची धक्कादायक कबुली!
शिवसेना तालुका प्रमुख असताना गावागावातील लहानमुलांचे केक कापणे, त्यांच्या गालावरुन हात फिरवणं, विवाहांना हजेरी लावणं, दहाव्याला जाणं असे सारे करणारे नीलेश लंके हे विजय औटी यांच्या अपमानास्पद बोलण्याचे- वागणुकीचे भांडवल पुढे करत आमदार झाले. आता देखील त्यांचे हे काम चालूच आहे. समाजाच्या सुखदु:खात लोकप्रतिनिधीने सहभागी झालेच पाहिजे. मात्र, आपल्याला ज्या कामासाठी जनतेने निवडून दिले आहे त्याचे भान देखील जपले पाहिजे. लोकसभेत नक्की कशासाठी जायचं आहे आणि तिथे नक्की काय भूमिका घ्यायची आहे याचा गृहपाठ लंके यांनी करण्याची गरज आहे. विवाह समारंभात अंतरपाट धरुन मतपेटी वाढेलही, मात्र मतदारसंघातील हजारपेक्षा जास्त गावांच्या प्रश्नांचं काय याचेही भान ठेवण्याची गरज आहे. केक कापून आणि खांद्यावर हात टाकून मी आमदार झालो, मावळमध्ये जन्माला आलो असतो तर तुमच्या नगरपालिकेचा नगरसेवकही झालो नसतो अशी जाहीर कबुली देणारे हेच ते नीलेश लंके! केक कापून, गळ्यात हात टाकून त्यांनी जनतेला उल्लू बनवले आहे काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.
विजू औटींसह दुखावलेल्या अन्य सहकार्यांकडून भांडाफोेड!
कधीकाळी खांद्याला खांदा लावून ज्या सहकार्यांनी काम केले, रात्रीचा दिवस केला अन् थेट विधानसभा मिळवून दिली, त्याच कार्यकर्त्यांना आज लंके नकोशे का झालेत याच्या खोलात जाण्यास स्वत: नीलेश लंके यांना आज वेळ नाही. ‘सह्या केलेल्या आमदारकीचं लेटरहेडच तुझ्याकडं’, असं ठणकावून सांगत गळ्यात हात टाकणारे हेच ते निलेश लंके! मात्र, आज त्याच नीलेश लंके आमचा केसाने गळा कापला असल्याचे त्यांनी कधीकाळचे मित्र विजु औटी व सहकारी सांगत आहेत. यावर बोलताना ते लंके यांच्या अनेक भानगडीही जाहीरपणे बोलतात. ज्या यंत्रणेबद्दल लंके अभिमानाने जाहीरपणे बोलायचे त्याच यंत्रणेचे रात्री बारानंतर काय चालू असते यावर औटी व त्यांचे समर्थक बोलत आहेत.
अधिकार्यांना मारहाण करण्याचा मुद्दा अजूनही का आहे चर्चेत?
कोरोना कालावधीतील काम ही जमेची बाजू असली तरी त्याच कालावधीत भाळवणीतील कोरोना सेेंटरमध्ये गौण खनिज विभागाशी संबंधीत अधिकार्यांना बोलावून एका बंद खोलीत त्या अधिकार्याची साग्रसंगीत ‘मालिश’ करण्यात आली. बंद खोलीत त्या अधिकार्याला मालिश करण्यासाठी वापरलेले साहित्य आणि वाळू तस्करीतील सवंगड्यांना घातलेल्या लाथा याचीही चर्चा मोठी झाली. त्या मालिशचे प्रकरण बरेच बोलके आहे. त्या प्रकरणाचा धसका त्यावेळी अनेक अधिकार्यांनी आणि कर्मचार्यांनी घेतला. पुढे त्याच कालावधीत पारनेरच्या महिला आरोग्य अधिकार्याचे प्रकरण गाजले. पारनेरच्या महिला तहसीलदारांकडून झालेल्या गंभीर आरोपाने तर राज्यात खळबळ उडवून दिली.
कारण नसताना कर्डिलेंना अंगावर घेतले आता तेच कर्डिले घेणार लंके यांना शिंगावर!
नगरच्या बाजार समिती निवडणुकीमध्ये नीलेश लंके यांनी नगर तालुयातील महाविकास आघाडीला साथ देत आपले सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. तसेच प्रचार मेळाव्यात कर्डिलेंच्या विरोधात भाषणेही ठोकली. विजय औटी यांच्या विरोधात जाऊन शिवाजी कर्डिले व त्यांच्या समर्थकांनी लंके यांना त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत मदत केली होती. मात्र, आमदार होताच त्याच लंके यांनी शिवाजी कर्डिले यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेत कर्डिले यांच्या विरोधात भाषणे ठोकली. बाजार समितीच्या त्या निवडणुकीत लंके समर्थकांचा धुव्वा उडाला. आता लंके लोकसभेला उभे आहेत. नगर तालुक्यातील ग्रामपंचायती, सोसायट्यांमध्ये लंके यांनी लक्ष घातले आणि कर्डिले यांच्या विरोधकांना ताकद दिली. याशिवाय गावागावातील आपल्याच समर्थकांना अडचणीत आणले. एकूणच नगर तालुक्यातून लंके यांना रोखण्यासाठी शिवाजी कर्डिले यांनी ताकद लावली नाही तर नवलच!
सासुरवाडीला सुद्धा न सोडलेले नीलेश लंके!
नगर तालुयात दोन टप्प्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आ. नीलेश लंके यांनी लक्ष घातले. पहिल्या टप्प्यात २८ तर दुसर्या टप्प्यात ८ गावांच्या निवडणुका झाल्या. यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर भाजपाने (कर्डिले-विखे गटाने) झेंडा फडकविला. अरणगाव ग्रामपंचायतीवर लंके गटाचा झेंडा फडकला. अरणगावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत तेथील मातब्बरांचा पराभव झाला. आमदाराने सासरवाडीच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत लक्ष घालणे ग्रामस्थांना रुचले नाही. राजकीयद़ृष्ट्या महत्वपूर्ण समजल्या जाणार्या या गावात म्हणजेच लंके यांच्या सासुरवाडीतच आता त्यांना पाय धरण्याची वेळ आली आहे.
जामखेडमधील भास्कर मोरेचं आधी कौतुक अन् नंतर वार्यावर!
भास्कर मोरे याच्या महाविद्यालयात विद्यार्थींनीच्या बाबतीत घडलेली घटना, त्या घटनेनंतर संतप्त विद्यार्थी- विद्यार्थीनींचे उपोषण आणि तुळजापुर दौर्यावर जाताना नीलेश लंके यांनी ते उपोषण सोडताना विद्यार्थ्यांच्या हिताच्या बाजूने आपण असू आणि तसे झाले नाही तर जिल्हाधिकार्यांच्या दालनात बैठक लावू असे केलेले भाष्य सध्या चर्चेचा विषय आहे. याच भास्कर मोरे याच्यासोबत याच नीलेश लंके यांनी एक- दोन नव्हे तर डझनभर जाहीर कार्यक्रम केले. भास्कर मोरेच्या कामाचे जाहीरपणे केलेले कौतुक अन् या कौतुक सोहळ्यात कर्जत- जामखेडचे आमदार रोहीत पवार आणि याच नीलेश लंके यांच्यात लागलेली स्पर्धा, त्याचे फुटेज सध्या व्हायरल होत आहे. याचाच अर्थ विद्यार्थ्यांवरील कथीत अन्यायाच्या अनुषंगाने नीलेश लंके यांनी रंग बदलत आपली भूमिका बदलली आणि भास्कर मोरे यांना वार्यावर सोडून दिले.
( पुढच्या अंकात भाजपा उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या बाबतचा ग्राउंड रिपोर्ट )