नगर शहरात ठाकरे गटाची शिवसेना कोणामुळे झालीय गलितगात्र | अनिल राठोड यांच्यासारखा आक्रमक चेहरा शोधून सापडेना!
सारिपाट / शिवाजी शिर्के-
शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी राऊत यांच्या समोर भाषण करताना अनिलभैय्या राठोड हयात नाहीत, त्यामुळे शहरात अमुक घडते, तमुक घडते असा रडीचा पाढा वाचला. मात्र त्याच वेळी किरण काळे यांनी राऊत यांच्या भेटीनंतर वक्तव्य करताना म्हटले की, स्व. अनिलभैय्या राठोड आज हयात नसले तरी असे कोणीही समजू नये की शहर पोरके झाले आहे. मात्र हे सारे होत असताना ठाकरे गटातील एकाही नगरसेवकासह शिवसेना पदाधिकार्याचे तोंड उघडले नाही. याचा दुसरा अर्थ काय? पंधरा मिनिटांच्या बैठकीत राऊतांना काँग्रेसच्या किरण काळे यांचे मुद्दे भावले. मात्र, त्याचवेळी शहरातील शिवसेना पदाधिकारी गप्प गार बसले होते. खरं तर नगर शहरातील शिवसेनेला गटबाजीचं मोठं ग्रहण लागले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत एक गट गेल्यानंतर दुसरा गट एकसंघ राहिल असं वाटत असताना प्रत्यक्षात तसे झाले नाही. पाहुण्यांच्या काठीने साप मारण्याची कायमची परंपरा ठाकरे गट जसा जपतोय तसंच ती परंपरा जपत आलाय तो एकनाथ शिंदे यांचाही गट! साप मेला पाहिजे असं दोन्ही गटाला वाटतं पण पाहुण्याच्या काठीने! हीच भूमिका आता दोन्ही गटांना मारक ठरणार असून कातडी बचावासह मतलबी भूमिका घेणार्या शिवसेनेच्या दोन्ही गटांबाबत त्यामुळेच नगरमध्ये संशयाचे मळभ तयार झाले आहे.
शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत नगर शहरात येऊन गेले. नुसतेच आले नाही तर शहरातील राजकीय गुंडगिरी, ताबेमारी विरोधात जोरदार बॅटिंग करून गेले. पत्रकार परिषदेला सुरुवात करण्यापूर्वी हॉटेल यश ग्रँडच्या तिसर्या मजल्यावर संजय राऊत आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या तब्बल वीस मिनिटे चर्चा झाली. शहरात पूर्वी अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक असणारी शिवसेना जरी आज त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर गलितगात्र झाली असली तरी अनिलभैय्यांचा वारसा सांगणार्या किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेस मात्र शिवसेना स्टाईलने आक्रमकरित्या काम करत असल्याचे राऊतांच्या भेटीत दिसून आले. काळे यांनी उपस्थित केलेले मुद्देच राऊत यांनी बैठकीत आणि त्याआधी पत्रकार परिषदेत मांडले. त्यातील वास्तव सत्य कदाचित वेगळे असेल आणि त्याविषयीचे भाष्य आम्ही कालच्या ‘सारीपाट’मधून केले आहेच. मात्र, नगर शहरात कायम वाघासारखी दिसणारी शिवसेना आज कोणाच्या तरी ताटाखालची मांजर झाली असेल तर त्यात दोष कोणाचा याचे उत्तर आपसूकपणे संजय राऊत यांनाच द्यावे लागणार आहे.
अर्थात कालच्या मेळाव्यात राऊत यांनी शिवसेना पदाधिकार्यांना काचपिचक्या दिल्याही! या कानपिचक्यामुळे सामान्य शिवसैनिकांना बंर वाटलं असले तरी पदाधिकार्यांमध्ये त्याचे कोणतेही पडसाद उमटण्याची सुतराम शक्यता वाटत नाही!
भयमुक्त नगर हा अनिल राठोड यांचा कायम नारा राहिला. विकास होत असतो, ती प्रक्रिया असून नगरकरांना संपूर्ण संरक्षण आणि भयमुक्त नगर हवंय आणि ते आम्ही देणार असं छातीठोकपणे सांगणार्या राठोड यांच्यानंतर कोणीच राहिलं नाही. आज तो वसा आणि वारसा चालवणारा चेहरा कोणामध्येही दिसायला तयार नाही. शिवसेना दोन गटात दुभंगली असली तरी एकाही गटात अनिल राठोड यांचा आक्रमक बाणा दिसत नसल्याचं वास्तव सत्य आहे. संजय राऊत यांनी ताबेमारीवर भाष्य केल्यानंतर चितळे रस्त्यावरील लोढा हाईटस्चा विषय जगताप समर्थकांनी छेडला आणि त्यावर राऊतांनी बोलावं असं जाहीर आव्हान दिले. शिवसेनेतून दोन ओळीचं प्रत्युत्तर अद्यापही यायला तयार नाही. राऊतांवरही जगताप समर्थकांनी आरोप केले. त्याला देखील कोणीच उत्तर दिल्याचं वाचण्यात नाही. याचाच अर्थ डाल मे कुछ काला है!
चितळे रस्त्यावरील ताबेमारीचा मुद्दा विरोधकांकडून तापवला गेला. लोढा हाईटस या व्यापारी संकुलातील पन्नास टक्के गाळे राठोड यांनीच ताबेमारी करत अनाधिकाराने ताब्यात घेतल्याची जाहीर चर्चा आहे. याच इमारतीवर मोबाईल टावर आहेत. त्याचे भाडेही राठोड यांच्याकडेच जात असल्याचा आरोप आहे. याच इमारतीमध्ये शितल आस्वाद या अनाधिकाराने तयार करण्यात आलेल्या हॉटेलबाबत अनेक तक्रारीही झाल्या. त्या हॉटेलचे भाडे काहीच संबंध नसताना राठोड हेच घेतात, अशी जाहीर चर्चा आहे. याच व्यापारी संकुलासाठी अर्बन बँकेने काही कोटी रुपयांचे कर्ज ‘लोढा’ या बांधकाम व्यावसायिकाला दिले. ते कर्ज आजही बँकेला येणे आहे.
बँक आर्थिक अडचणीत आली असताना येथील कर्जाची वसुली करण्यासाठी अनाधिकाराने झालेली ताबेमारी बाजुला करण्यात आली तर ठेवीदारांना दिलासा मिळू शकतो आणि त्यांची रक्कम त्यांना मिळू शकते. लोढा हाईटसची ताबेमारी जशी चर्चेत आहे तशीच चर्चेत आहे त्याच परिसरातील काही मोकळ्या जागांवर मारलेली ताबेमारी! त्या ताबेमारीचा संबंध थेट राठोड यांच्याच कटुंबाशीच जोडला जातोय! खा. संजय राऊत यांनी उपस्थित केलेला ताबेमारीचा मुद्दा वरकरणी जगताप यांच्याशी संबंधीत वाटत असला तरी कागदावर कोठेच त्यांचे नाव दिसत नाही. मात्र, दुसरीकडे राठोड यांच्याबद्दल नावानीशी तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. शहरात गणपतीची वर्गणी न देणार्या व्यापारी-दुकानदारांना महापालिकेला हाताशी धरत बोगस तक्रारी करत अतीक्रमणाच्या नोटीसा काढण्याचा मुद्दाही आता समोर येत आहे. मध्यवर्ती शहरातील दोनशेपेक्षा जास्त व्यापार्यांना या नोटीसा मागील गणेशोत्सवात मिळाल्या! वर्गणी जमा करताच या नोटीसा बासनात गुंडाळून ठेवण्यात आल्या.
नगर शहरात शिवसेना म्हणजे अनिल राठोड हे सुत्र तयार झाले होते. किरण काळे यांना शिवसेनेमध्ये घेण्याची अनिल भैय्या यांची तीव्र इच्छा होती. जगताप यांना विरोध करू शकणारा तरुण आक्रमक मराठा चेहरा म्हणून अनिल राठोड यांनी काळे यांना हेरले होते. तसा प्रस्ताव स्वतः अनिल भैय्या यांनी काळे यांच्यासमोर ठेवला होता. या चर्चेच्या बैठका देखील त्यांच्या झाल्या होत्या. मात्र महाविकास आघाडी सरकार स्थापनेला झालेला विलंब आणि दरम्यानच्या काळामध्ये बाळासाहेब थोरात यांनी काळे यांना गळाला लावत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून धुरा सोपवली. शिवसेनेत घेऊन काळे यांना शहर प्रमुख करण्याची तयारीही राठोड यांनी केली होती. मात्र, हे सारे प्रत्यक्षात येण्याआधीच अनिल राठोड यांची अकाली एक्झीट झाली.
ताबेमारीच्या मुद्यावर शिवसेना आक्रमक झाल्याचे दिसत असताना व या मुद्यावर आ. संग्राम जगताप यांना घेरल्याचे वातावरण अवघ्या काही तासात शांत झाले. जगताप यांच्यावर आज तरी राठोड यांच्यासारखा ताबेमारीचा थेट आरोप दिसायला तयार नाही. समर्थकांची नावे चर्चेत आली असतीलही! मात्र, थेट नाव त्यात यायला तयार नाही. गुंड आणि झुंडशाहीच्या विरोधात लढणारी शिवसेना आज गलीतगात्र झाली असून ही परिस्थिती कोणामुळे ओढवली याचे आत्मचिंतन होण्याची गरज आहे.
शिंदे गटाच्या शिवसेनेचे फक्त नगर शहरात दिसणारे अस्तित्वही अदखलपात्र
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील शिवसेनेत दोन पडले! नगरही त्याला अपवाद राहिले नाही. शिंदे यांच्याशी आधीपासूनच सलगी असणारे नगर शहरातील काही पदाधिकार्यांनी ठाकरे यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते एकनाथ शिंदे गटात सामील झाले. नगर शहर वगळता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिंदे गटात सामिल झालेल्या पदाधिकार्यांची संख्या तशी तोकडीच! उत्तरेचे खा. सदाशिव लोखंडे हे शिंदे गटात गेल्याचे दिसत असले तरी त्यांचे स्वत:चे वेगळे वलय आजही दिसायला तयार नाही. नगर दक्षिणेत शिंदे गटाला कोणाच्या कुबड्या आहेत हे सर्वश्रूत आहे. अनिल शिंदे, दिलीप सातपुते या दोघांचा अपवाद वगळता अन्य बहुतांश पदाधिकारी हे मंत्रालयात बुधवारी नियमीत हजेरी लावतात. त्यांची ती हजेरी आणि त्यांची कामे, त्यातून मिळणारे टेंडर याची चर्चा लपून राहिलेली नाही. यातील काहींच्या जनाधाराबद्दल न लिहीलेले बरे! राज्याच्या सत्तेत असूनही जनतेच्या हिताची कामे करण्यापेक्षा काही पदाधिकार्यांचा टक्केवारीसह अधिकार्यांच्या बदल्या अन् लिटीगेशनची कामे मार्गी लावण्यात आणि शिफारस पत्रांच्या आधारे घर भरविण्यावरच भर दिसत असल्याचे लपून राहिलेले नाही. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अस्तित्वहिन दिसणारी शिंदे गटाची शिवसेना नगर शहरात चार-पाच चेहर्यांपुरतीच मर्यादीत राहिली असून ती देखील अदखलपात्र का झालीय याचे चिंतन आता दस्तुरखुद्द एकनाथभाई म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी करण्याची आवश्यकता आहे.
आ. लंकेंच्या डोक्यातील लोकसभेचा खटका कायम!
विखेंसह भाजपा समर्थकांना ‘डफडी वादक’ संबोधत हिणवले!
आदेश माणनारा कार्यकर्ता असल्याचे सांगून लोकसभा निवडणुकीत अजित पवार सांगतील तो आदेश मान्य करणार असल्याचे जाहीर करणार्या पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी त्यांच्या डोक्यातील लोकसभेचा खटका कायम असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. तालुक्यातील एका गावातील विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी त्यांनी खा. सुजय विखे यांना पुन्हा एकदा टार्गेट केले. डाळ-साखर वाटपापेक्षा विकास कामे करा असा सल्ला दिला. कोणत्याच गावात विखेंचा एक रुपयाचा निधी नसल्याचा आरोपही त्यांनी केला. विखेंसह त्यांचे पीए देखील फोन घेत नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. झेडपीच्या प्रशासकीय मान्यता चोरणारी आणि तीच कामे केल्याचा दिखावा करणारी ही मंडळी असल्याचा आरोपही त्यांनी केला. लोकसभा निवडणूक झाली की विखेंसह त्यांच्या त्यांची डफडी काढून घेणार असल्याचे जाहीर आव्हान आ. लंके यांनी दिले. याचाच अर्थ आ. लंके यांनी आता विखेंना आडव्या हाताने घेण्याची तयारी केली असल्याचे आणि लोकसभेला लंके हेच उमेदवार असणार असल्याचे संकेत त्यांनी दिलेत. राज्याच्या महायुतीत आ. लंके हे फडणवीस यांच्या सरकारमध्ये असतानाही त्यांनी भाजपा समर्थकांची डफडी फोडण्याची भाषा केल्याने त्याला भाजपाच्या गोटातून काय उत्तर येते हे पहावे लागणार आहे.