अहिल्यानगर | नगर सह्याद्री
मागील जेवणाचे बिल मागितल्याचा रागातून एका ग्राहकाने हॉटेल चालकावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची धक्कादायक घटना नगर कल्याण रोडवरील गणेश नगर परिसरात घडली आहे. आरोपीने हॉटेल चालकाला खाली पाडून लाथाबुक्क्यांनीही बेदम मारहाण केली. ही घटना २ नोव्हेंबर रोजी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास ‘भावकी’ हॉटेलमध्ये घडली.
याप्रकरणी हॉटेल चालक शोभराज मुरलीधर वांदेकर (वय २७, रा. आदर्श नगर, नगर कल्याण रोड) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दत्ता सोनवणे (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शोभराज वांदेकर यांचे नगर कल्याण रोडवर ‘भावकी’ नावाचे हॉटेल आहे. २ नोव्हेंबर रोजी रात्री ८.४५ च्या सुमारास आरोपी दत्ता सोनवणे हा त्याच्या एम.एच.१६ ४०४५ क्रमांकाच्या सियाझ कारने हॉटेलवर आला. यावेळी वांदेकर यांनी सोनवणे याच्याकडे मागील जेवणाचे बिल मागितले. या गोष्टीचा सोनवणे याला प्रचंड राग आला. त्याने याच रागातून वांदेकर यांना शिवीगाळ करत दमदाटी करण्यास सुरुवात केली. प्रकरण इतयावरच थांबले नाही, तर त्याने लोखंडी रॉडने वांदेकर यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनीही मारहाण केली.या हल्ल्यात वांदेकर हे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर फिर्यादीने मध्यरात्री कोतवाली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी पोहेकॉ. एस.एच. वाघ हे पुढील तपास करत आहेत.


                                    
