मुंबई / नगर सह्याद्री –
एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Election) अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होत असून दुसरीकडे निवडणूक मतदार यादीतील घोळांवरुन राजकीय वातावरण तापलं आहे. त्याच अनुषंगाने उच्च न्यायालयात (High court) दाखल याचिकांवर आज सुनावणी संपन्न झाली. न्यायालयात दाखल एकूण 42 याचिकांपैकी 4 याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, मतदार (Voter list) यादीच्या ड्राफ्टवर आक्षेप घेण्यास कमी अवधी मिळाल्यासंदर्भातही याचिका दाखल करण्यात आली होती.
मतदार यादीच्या ड्राफ्टवर आक्षेप घेण्यास मिळालेला कमी अवधी, ऑनलाइन अर्ज करुन देखील यादीत नाव नसणे आणि मतदार यादीतील नाव ट्रान्सफर करण्याची मागणी करणाऱ्या चारही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. मतदार यादीविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर न्यायालयात आज सुनावणी पार पडली, तर आरक्षण आणि सीमांकन संदर्भातील याचिकांवर गुरुवारी सुनावणी होणार आहे. मतदार यादी, सीमांकन आणि आरक्षणाच्या संदर्भात एकूण 42 याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्याच अनुषंगाने हायकोर्टात सुनावणी होत असून न्यायालयाने आज 4 याचिका फेटाळल्या आहेत.
मुंबई उच्च न्यायालयात वर्ग झाल्या याचिका
दरम्यान, मतदार यादीच्या ड्राफ्टवर आक्षेप घेण्यासाठी केवळ सहा दिवसांचा अवधी होता. मात्र, मराठवाड्यात विदर्भात पूर परिस्थिती असल्याने याचिकर्त्यांना आक्षेप नोंदवणं शक्य झालं नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार प्रक्रिया पार पडली असून आक्षेप ग्राह्य धरता येणार नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले. त्याच अनुषंगाने दाखल पहिली याचिका देखील फेटाळण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे, या सगळ्या 42 याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्यात येत आहे. त्यामध्ये, मतदार यादी, सीमांकन आणि प्रभाग आरक्षणाच्या मुद्द्यावर याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु असून नागपूर खंडपीठातून, तसेच औरंगाबाद खंडपीठात दाखल झालेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयात वर्ग करण्यात आल्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आजच घोषणा
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाकडून आजच पत्रकार परिषदेत निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकींच्या तारखा जाहीर केल्या जाण्याची चिन्हे आहेत. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेणार असून याच परिषदेत ते निवडणुकीच्या तारखांची अधिकृत घोषणा करतील, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.


                                    
