अहिल्यानगर । नगर सहयाद्री
अहिल्यानगर शहरात शुक्रवार (दि. ५ सप्टेंबर) रोजी ग्रामसेवकाला बंदुकीचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्यादी दिलीप संजय मिसाळ (वय ३९, ग्रामपंचायत अधिकारी, रा. खेटाकळी, ता. शेवगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी अमोल चंद्रकांत गवळी (रा. जवखेडे खालसा, ता. पाथर्डी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल गवळी यांनी फिर्यादी दिलीप संजय मिसाळ यांना अडवले. यावेळी त्याने बंदुकीचा धाक दाखवत, ऐ ग्रामसेवक, माझ्याकडे बंदूक आहे, यातील सहा गोळ्या तुझ्या घालीन, अशी धमकी दिली. तसेच, “तू आमच्या विरोधकांचे ऐकून काम करत होतास, आता आमचे नेते खासदार आहेत, आम्ही फक्त तुमची आणि विरोधकांची जिरवणार अशा शब्दांत धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सपकाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सपकाळे करीत आहेत.