धाराशिव / नगर सह्याद्री –
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे आणणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आणखी एक नवीन गौप्यस्फोट केला आहे. त्यांचं आंदोलन दडपण्यासाठी सरकार स्वत:चं आंदोलन उभं करणार आहे. सरकारचे दोन मंत्री त्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोन मंत्र्यांची चर्चा झाल्याची माहिती एक मंत्र्याने आपणास दिल्याचा खळबळजनक दावा मनोज जरांगे यांनी केला आहे.
सरकार आणखी एक मराठा आंदोलन उभं करणार आहे. त्या आंदोलनात दोन मंत्री असणार आहेत. १२ ते १३ दिवस आमरण उपोषण करणार आहेत. त्यातील एक मंत्र्यांनी मला ही माहिती दिली. त्यानंतर १४ दिवसानंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. मंत्र्यांना सोबत घेत सरकार नवे मराठा आरक्षण आंदोलन उभे करण्याच्या तयारीत आहे, असा गौप्यस्फोट मनोज जरांगे पाटील यांनी केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मंगळवारपर्यंत देवेंद्र फडणवीस आरक्षणाचा मार्ग काढतील. हैद्राबाद, बॉम्बे आणि सातारा गॅझेट लागू करतील, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले, तिन्ही गॅझेट मंगळवारपर्यंत देवेंद्र फडणवीस लागू करतील अशी मला आशा आहे. शिंदे समितीकडे सात महिन्यांपासून गॅजेटचा विषय आहे. त्यामुळे त्याबाबत अभ्यास झाला आहे. १५ दिवसात सगळा अभ्यास होतो, असं जरांगे यांनी म्हटलं.