अहमदनगर । नगर सहयाद्री-
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 37-अहमदनगर व 38- शिर्डी लोकसभा मतदारसंघात दिनांक १३ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या दिवशी कामगारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याच्या शासनाने सुचना दिल्या आहेत. शासनाच्या सुचनेनुसार कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश सहायक कामगार आयुक्त यांनी दिले असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाकडील 5 एप्रिल २०२४ च्या परिपत्रकानुसार हे आदेश देण्यात आले आहेत.सदर सुट्टी उदयोग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणा-या आस्थापना, कारखाने, दुकाने आदींना लागू राहील (खाजगी कंपन्या या मधील आस्थापना सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खादयगृहे, अन्य् गृहे, नाटयगृहे, शॉपींग सेंटर मॉल्स् इ.)
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यांदीना पुर्ण दिवस सुटटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटटी ऐवजी दोन ते तीन तासाची सुटटी, सवलत देण्यात यावी. मात्र याबाबत त्यांनी संबधित महापालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांची पुर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहिल.