अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
सोशल मीडियावरील ओळखीतून मैत्री आणि नंतर लग्नाचे आमिष दाखवून एका २१ वर्षीय तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात जहिद फारुख तांबोळी (रा. केडगाव, अहिल्यानगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असलेली २१ वर्षीय पीडिता पुण्यात खाजगी नोकरी करते. सुमारे चार वर्षांपूर्वी तिची इंस्टाग्रामवरून आरोपी जहिद तांबोळी याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि दोघेही मोबाईलद्वारे एकमेकांच्या संपर्कात होते. आरोपी जहिदने पीडितेला लग्नाचे वचन देऊन तिचा विश्वास संपादन केला. १६ सप्टेंबर रोजी त्याने तिला भेटण्यासाठी अहिल्यानगरला बोलावले.
त्यानंतर केडगाव येथील एका पान शॉपमध्ये आणि नंतर आरणगाव रोडवरील लॉजमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडितेने लग्नाविषयी विचारणा केली असता, आरोपीने तिला शिवीगाळ व दमदाटी करून पुण्यात निघून जाण्यास सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने थेट कोतवाली पोलीस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मीटरला रिमोट लावून ३.३१ लाखांची वीजचोरी
शहरातील गोविंदपुरा परिसरात असलेल्या एका जनरल स्टोअर्सच्या मालकाने मीटरमध्ये रिमोटद्वारे फेरफार करून तब्बल ३ लाख ३१ हजार रुपयांची वीज चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महावितरणचे सहाय्यक अभियंता धनंजय त्रिंबक एकबोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक बाबूलाल पंजवानी याच्याविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक पंजवानी याचे गोविंदपुरा येथे ‘श्री दत्तराज जनरल स्टोअर्स’ नावाचे दुकान आहे. त्याने सप्टेंबर २०२४ ते सप्टेंबर २०२५ या वर्षभराच्या कालावधीत दुकानातील मीटरमध्ये रिमोट किंवा जॅमरचा वापर करून मीटर बंद पाडले. या काळात त्याने एकूण १४,५७४ युनिट्सची वीजचोरी केली. महावितरणच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीत हा प्रकार उघड झाला. महावितरणने पंजवानी याला अधिभारासह एकूण ३ लाख ३१ हजार ७१० रुपयांचे वीजचोरीचे देयक दिले होते. मात्र, आरोपीने हे देयक न भरल्याने अखेर धनंजय एकबोटे यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, पंजवानी विरोधात भारतीय विद्युत कायदा २००३ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
किरकोळ वादातून विद्यार्थ्याने शिक्षकावर केला लोखंडी रॉडने हल्ला
शहरातील प्रसिद्ध गरुड झेप अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यानेच शिक्षकावर हल्ला केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. इतर विद्यार्थ्यांना मारहाण करण्यापासून रोखल्याचा राग मनात धरून एका विद्यार्थ्याने आपल्या ४ ते ५ मित्रांसह शिक्षकाला बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. अकॅडमीतील विद्यार्थी इतर मुलांना त्रास देत असल्याची तक्रार आल्याने एक शिक्षक मध्यस्थीसाठी गेले होते. याचा राग आल्याने संबंधित विद्यार्थ्याने त्यांना शिवीगाळ करत बाहेरून मित्रांना बोलावून घेतले. या टोळक्याने शिक्षकाला घेराव घालून लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. मुख्य विद्यार्थ्याने लोखंडी रॉडने शिक्षकाच्या डोक्यावर आणि पाठीवर हल्ला केला, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी पोलीस केस केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. जखमी शिक्षकाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर, अपघात झाल्याचे खोटे सांगण्यासाठी आरोपींनी इतर विद्यार्थ्यांनाही धमकावले. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, पीडित शिक्षकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
घरातून पावणेसात लाखांचे दागिने लंपास!
दसऱ्याच्या दिवशी रावणदहन पाहण्यासाठी घराबाहेर पडणे एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले आहे. शहरातील वाकोडी रोडवरील डॉक्टर कॉलनी परिसरात राहणारे व्यावसायिक राहुल सुनील ससाणे यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ६ लाख ९० हजार ८०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईल फोन चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी राहुल ससाणे (वय ३१) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ससाणे कुटुंब गुरुवारी, दि. २ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास दसऱ्यानिमित्त मार्केट यार्ड येथे आयोजित रावणदहन कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. हीच संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या सेफ्टी डोअरचा कोयंडा आणि मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातील बेडरूममधील कपाट उचकटून चोरट्यांनी सोन्याचे राणी हार, कानातील वेल, झुमके, सोन्याच्या बाळ्या, अंगठ्या, नथ आणि चांदीचे जोडवे-कडे असा एकूण पावणेसात लाखांचा ऐवज लंपास केला. रात्री दहा वाजता कुटुंब घरी परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, कोतवाली पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.