मुंबई । नगर सहयाद्री
पारनेर शहराचे माजी नगराध्यक्ष विजय औटी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी विधान परिषदेचे आमदार शिवाजी गर्जे, पारनेरचे आमदार काशिनाथ दाते, जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. या नियुक्तीचे पारनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी स्वागत करत अभिनंदन केले. माजी नगराध्यक्ष विजय औटी हे पारनेर तालुक्यातील ओळखले जाणारे संघटक असून, त्यांच्या नेतृत्वात पक्ष अधिक बळकट होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
पक्षातील सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे औटी यांनी सांगितले. अहिल्यानगर जिल्ह्यात माजी नगराध्यक्ष औटी यांचे भक्कम संघटन असून, त्यांच्या नेमणुकीमुळे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिक फायदा होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान विजय औटी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
मात्र, महाविकास आघाडीच्या निर्णयानुसार त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार काशिनाथ दाते यांना पाठिंबा देत उमेदवारी मागे घेतली होती. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून निवडणुकीत सक्रिय भूमिका बजावली. त्यांच्या या समर्पित कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पारनेर मतदारसंघाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करून ‘कामाचे बक्षिस’ दिली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.