अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात एका शिक्षकाने शाळेच्या चेअरमन आणि स्वीकृत सदस्यावर निलंबन मागे घेण्यासाठी 5 लाख रुपये खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे. फिर्यादी गी नासिर ख्वाजालाल खान (वय 51, शिक्षक, रा. समीरनगर, मुकुंदनगर, अहिल्यानगर) यांनी अब्दुल मतीन अब्दुल रहीम (चेअरमन, रा. झेड, एम टॉवर, सावेडी) एक स्विकृत सदस्य यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.
ही घटना 9 जुलै 2025 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालयाजवळील एका हॉटेलमध्ये घडली. फिर्यादी गी नासिर यांना 15 एप्रिल 2025 रोजी ए.टी.यू. जदीद उर्दू प्राथमिक शाळा, माणिक चौक येथून मुख्याध्यापक पदावरून निलंबित करण्याचा आदेश मिळाला होता. याविरुद्ध त्यांनी संभाजीनगर उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केली. याचा राग आल्याने चेअरमन अब्दुल मतीन यांनी खोटे आरोप लावल्याचा दावा फिर्यादींनी केला आहे.
तहसील कार्यालयात गी नासिर यांची अब्दुल मतीन आणि वहाब सय्यद यांच्याशी भेट झाली. यावेळी चेअरमनने त्यांना हॉटेलमध्ये बोलावून 5 लाख रुपये देण्याची मागणी केली आणि निलंबन मागे घेण्याचे आश्वासन दिले. तसेच, पैसे न दिल्यास कायमचे घरी बसवून बदनामी करण्याची धमकी दिली. फिर्यादींनी याप्रकरणी तक्रार नोंदवली असून, भारतीय न्यायसंहिता 2023 अंतर्गत कारवाई सुरू आहे.