Satish Bhosale: पितापुत्रांना अमानुष मारहाण करणारा सतीश उर्फ खोक्या भोसलेला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रयागराज येथून त्याला ताब्यात घेतले. तो आमदार सुरेश धस यांचा निकटवर्ती मानला जातो. गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता, मात्र पोलिसांनी सतत तपास करून त्याला शोधून काढले.
खोक्यानं माध्यमांना मुलाखती दिल्यामुळे पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली असून लवकरच त्याला महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे. त्याने बॅटनने एका व्यक्तीला मारहाण करून त्या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल केला होता, ज्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं.
प्रयागराज पोलिसांनी त्याला अटक करून सध्या ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला या कारवाईत यश आले असून, उद्यापर्यंत त्याला बीडमध्ये आणले जाण्याची शक्यता आहे. खोक्या भोसलेवर तीन गुन्हे दाखल असून, ढाकणे पितापुत्रांना मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्याच्या घरी गांजा सापडल्यामुळे आणखी एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून तो बीडमध्ये लपून राहत होता, मात्र पोलिसांना सापडत नव्हता. अखेर प्रयागराजमध्ये पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली. याप्रकरणामुळे आमदार सुरेश धस यांच्यावरही राजकीय दबाव वाढला होता. त्यांनी खोक्या हा केवळ सोशल मीडियावर रिल्स करत असल्याचे म्हटले होते. मात्र, त्याच्या मारहाणीच्या प्रकरणामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. आता खोक्याला अटक झाल्याने धस यांच्या अडचणी काही प्रमाणात कमी झाल्या असल्याचे बोलले जात आहे.