अहमदनगर । नगर सहयाद्री-
अरणगाव (ता. नगर) येथील शनी चौकातील एका घरावर दोघा भावांनी मध्यरात्री दगडफेक केली. दगडफेक केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या बाप- लेकाला मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. मारहाणीत अन्सार मेहबुब शेख (वय २३) व त्यांचे वडिल मेहबुब शेख जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमी अन्सार यांनी दिलेल्या जबाबावरून दोघा भावांविरूध्द खूनाचा प्रयत्न कलमानुसार नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा बाबासाहेब गुंड, गणेश बाबासाहेब गुंड (दोघे रा. अरणगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शेख कुटूंब घरात झोपलेले असताना कृष्णा व गणेश यांनी रविवारी (दि. २१) रात्री साडेबारा वाजता घरावर दगडफेक केली. घराच्या दिशेने दगडफेक होत असल्याचे पाहून अन्सार बाहेर आले.
त्यांनी दगडफेक करण्याचा जाब विचारला असता तु आम्हाला विचारणारा कोण आहेस, थांब तुझ्याकडे बघतो असे म्हणून अन्सार यांच्या दिशेने वीट फेकली ती त्यांनी हुकवली. त्यानंतर थांब तुला आता जिवंत सोडणार नाही असे म्हणून कृष्णा व गणेश यांनी अन्सारवर जिवे मारण्याच्या उद्देशाने दगडफेक केली. यात अन्सार गंभीर जखमी झाला आहेे. अन्सारचे आई-वडिल भांडण सोडविण्यासाठी मध्ये आले असता त्यांना देखील शिवीगाळ केली. वडिल मेहबुब यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीणचे उपअधीक्षक संपत भोसले, नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते, उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. सोमवारी (दि. २२) रात्री गुन्हा दाखल झाला असून उपनिरीक्षक गांगुर्डे अधिक तपास करत आहेत.