अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
जिल्हा सहकारी बँकेच्या सोनगाव (ता. राहुरी) शाखेतील बनावट सोने तारण प्रकरणी दाखल गुन्ह्यात येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आठ संशयित आरोपींना अटक केली आहे. राहुरी पोलीस ठाण्यात सदरचा गुन्हा दाखल असून या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. दरम्यान, या आठ संशयित आरोपींना गुरूवारी राहुरी येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवस (24 मेपर्यंत) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
संजय रखमाजी बेल्हेकर (रा. सात्रळ, ता. राहुरी), बाळासाहेब सूर्यभान पडघलमल (रा. रमाईनगर, सात्रळ, ता. राहुरी), प्रवीण अरूण शिरडकर (रा. कोल्हार खुर्द ता. राहुरी), विजय बबन कोरडे (रा. धानोरे, ता. राहुरी), अक्षय तुकाराम गडगे (रा. माळेवाडी सात्रळ, ता. राहुरी), गणेश जयराम दाते (रा. राजुरी रस्ता, कोल्हार बुद्रुक ता. राहाता), दत्तात्रय सखाराम शेळके (रा. कोल्हार भगवती, ता. राहाता), दत्तात्रय विठ्ठल वाणी (रा. झरेकाळी, ता. संगमनेर) अशी अटकेतील संशयित आरोपींची नावे आहेत. संशयित आरोपींनी 9 एप्रिल 2018 ते 17 सप्टेंबर 2019 या कालावधीत जिल्हा सहकारी बँकेच्या सोनगाव शाखेत बनावट सोने ठेवून कर्ज घेत बँकेची तब्बल एक कोटी 71 लाख 33 हजार 400 रूपयांची फसवणूक केली होती.
या प्रकरणी प्रवीणकुमार पाराजी पवार (रा. लोणी- सोनगाव रस्ता, राहुरी) यांनी 19 डिसेंबर 2020 रोजी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. 107 संशयित आरोपींविरोधात हा गुन्हा दाखल असून या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आरोपी पसार होते. पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक आठरे यांच्या पथकाने संशयित आठ जणांना ताब्यात घेत अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून इतर संशयित आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.