अहमदनगर / नगर सह्याद्री
अहमदनगर जिल्ह्यातील अग्रगण्य संस्था म्हणुन नावलौकिक असलेल्या जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या मॅनेजीन कौन्सिलच्या सदस्यपदी डॉ. भाऊसाहेब खिलारी (पारनेर) व राजेंद्र चंद्रकांत मोरे (संगमनेर) यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल डॉ. खिलारी व मोरे यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अॅड. राहुल नंदकुमार झावरे व वसंत कापरे यांना संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलमधून वगळण्यात आले. त्यांच्या जागी डॉ. खिलारी व मोरे यांची निवड करण्यात आली.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलमध्ये दरे दीपक रामचंद्र, हापसे शंतनू मोहनराव, काळे अरूणाताई अशोक, खानदेशे अभय गेनूजी, मरकड बाळकृष्ण देवराम, मोरे माणिकराव नामदेवराव, पोकळे अर्जुनराव तात्याबा आदींचा समावेश आहे. नव्याने नियुक्त झालेल्या डॉ. भाऊसाहेब सीताराम खिलारी (पारनेर), राजेंद्र चंद्रकांत मोरे (संगमनेर) यांचे जिल्हा मराठा संस्थेसह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
राज्यात नावलौकिक असलेल्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेमध्ये पदभरतीमधील गैरव्यवहार व अनियमितता यामुळे वादग्रस्त ठरल्याने माजी अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे यांना राजीनामा द्यावा लागला होता. ४ ऑगस्ट रोजी संस्थेत विश्वस्तांनी माजी अध्यक्ष झावरे यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव आणला. त्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. १४ विश्वस्तांनी मतदान केले. दरम्यान, प्राध्यापक पद भरती प्रक्रिया रद्द करावी लागली होती. या प्रकारामुळे जिल्हा मराठा संस्था चर्चेत आली होती.