मुंबई / नगर सह्याद्री –
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण चर्चेत असतानाच दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणावरुन शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त करत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
“गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये उद्विग्न अस्वस्थता आहे. डोळ्यासमोर जी काही बेबंधशाही सुरू आहे. महाराष्ट्र काय आहे हे माहीत नसलेले निर्ढावलेले पणे बोलत आहेत. पण महाराष्ट्रातील लोकांची मन दुखावली आहेत, गुंडांचा हैदोस महाराष्ट्रामध्ये सुरू आहे.. सरकारमध्ये गँगवार सुरू आहे,” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
“अभिषेक घोसाळकरची हत्या झाली. त्यानंतर या गुंडाने स्वतः आत्महत्या का केली? फेसबुक लाईव्हमध्ये गोळ्या घातल्या, पण गोळ्या कोण घालतंय हे त्यात दिसत नाही. बॉडिगार्डच्या बंदुकीने त्याने गोळ्या घातल्या असं सांगितलं जातंय, पण त्या मॉरिस ला बॉडीगार्ड का ठेवावा लागला? त्या दोघांची सुपारी कोणी दिली होती का?” असा गंभीर सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
“गाडीखाली श्वान आला तरी राजीनामा मागतील असंच बोलले ना. श्वान हा संस्कृत शब्द बोलल्याने सुसंस्कृत होत नाही. निर्ढावलेला, निष्ठूर आणि निर्दयी गृहमंत्री आहे. आम्ही राज्यपालांकडे जाणार नाही. आम्ही आपल्या माध्यमातून मागणी करतो राज्य बरखास्त करा, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा आणि लवकर निवडणुका लावा,” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.