विखे समर्थकांचा अजब सवाल? आता नीलेश लंके यांना लपता येणार नाही अन् विखे यांना सिद्ध करावे लागणार!
अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर लोकसभेच्या उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय हालचाली झाल्या. पन्नास वर्षांच्या विखेंच्या यंत्रणेला सुरुंग लावला अशा मथळ्याखाली बातम्या झळकल्या आणि त्या व्हायरलही झाल्या! विखेंच्या इशार्यावर एमआयएम, वंचित आणि अपक्ष लंके यांनी अर्ज भरल्याची चर्चा झडली आणि आज या सर्वांनी लंके यांच्या इशार्यावर हे अर्ज मागे घेतले असा अर्ज ध्वनीत झाला. शिवसेना बंडखोर गिरीष जाधव यांचा अर्ज अपेक्षेप्रमाणे मागे आला इतकाच! माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणुकीतील चित्र स्पष्ट झाले असताना नीलेश लंके यांनी विखे यांच्या पन्नास वर्षांच्या यंत्रणेला सुरुंग लावल्याची पोस्ट बरीच बोलकी ठरली. अपक्ष लंके, एमआयएम आणि वंचितच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करताच या सर्वांचे अर्ज विखेंच्या इशार्यावर भरल्याची चर्चा झडली आणि आता या सर्वांनी उमेदवारी माघार घेताच लंके यांनी विखेंना सुरुंग लावला म्हणजेच या तीघांचेही ओटीभरण लंके यांनी केले का असा सवाल विखे समर्थक करू लागले आहेत.
नगर लोकसभेच्या निवडणुकीत निवडणूक जाहीर झाल्यापासून मोठी नाट्यमय हालचाली सुरू आहेत. सुजय विखे आणि नीलेश लंके यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोघांच्याही यंत्रणा सतर्क झाल्या. दोघांनीही एकमेकांवर थेट हल्ला केला आणि आपणच कसे सक्षम आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न प्रचार सभांमधून केला. या मतदारसंघात एकास एक लढत झाल्यास आपणास फायदा होईल असे गणित नीलेश लंके यांच्याकडून मांडले जात होते. त्यानुसार व्यूहरचना देखील केली जात होती.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यापाठोपाठ एमआयएम या पक्षाकडूनही उमेदवारी अर्ज दाखल झाला. हे दोन्ही उमेदवार विखे यांच्याकडूनच मतांची विभागणी होण्यासाठी दिले गेलेत असा कांगावा लागलीच सुरू झाला. ही चर्चा थांबत नाही तोच नीलेश लंके यांचे नावसाधर्म्य असणार्या नीलेश साहेबराव लंके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
अपक्ष नीलेश लंके यांचा अर्ज आल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या अर्जाचा पर्दाफाश केला आणि नीलेश लंके यांचे सुचक आणि अनुमोदक, नोटरी, वकील हे सुजय विखे यांचे कसे समर्थक आहेत हे पुराव्यानिशी समोर आणले. या अपक्ष अर्जामुळे आणि त्यातील सुचक, अनुमोदक यांची पोलखोल होताच विखे यांच्या हेतूबद्दल अनेकांनी शंका उपस्थित केली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नीलेश लंके यांच्या मतांचे विभाजन होण्यासाठी विखे यांनीच हे सारे उमेदवार दिले असल्याची चर्चा आणि बातम्या लागलीच समोर आल्या. त्यात गैर काहीच नव्हते.
मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष नीलेश लंके यांच्यासह एमआयएम आणि वंचित या तीघांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतले. या तीघांचेही उमेदवारी अर्ज मागे घेतले जाताच सोशल मिडियावर पवार गटाचे उमेदवार नीलेश लंके यांच्या समर्थकांकडून, ‘विखे यांच्या पन्नास वर्षांच्या यंत्रणेला सुरुंग’, या मथळ्याखाली सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल झाल्या आणि नीलेश लंके समर्थकांचे स्टेटसही दिसू लागले. विखे यांच्या यंत्रणेला सुरूंग लावण्यात पवार समर्थक उमेदवार नीलेश लंके हे यशस्वी झाले असाच काहीसा या पोस्टचा अर्थ! याचाच अर्थ हा सुरूंग म्हणजेच या तीनही प्रमुख उमेदवारांचे अर्ज मागे घ्यायला लावण्यात नीलेश लंके हे यशस्वी ठरले.
विखे यांच्या इशार्यावर या तीघांनी अर्ज भरले असतील तर मग लंके यांच्या इशार्यावर या तीघांनी अर्ज मागे घेतले असाच त्याचा अर्थ ध्वनीत होतो. विखे यांच्याकडून ‘प्रसाद’ घेतला आणि अर्ज दाखल केले असा या तीघांवरही नीलेश लंके समर्थकांनी आरोप केला होता. आता या तीघांचीही माघार झाली आणि ती देखील लंके यांच्या प्रयत्नातून! म्हणूनच या तीघांनीही लंके यांचा ‘प्रसाद’ घेतल्याचा आरोप विखे समर्थकांनी सुरू केलाय! बिच्चार्या या तीघांनाच माहिती की त्यांच्या उमेदवारीचे नक्की काय ते? यातून जनतेचे मनोरंजन झाले असले तरी या तीघांच्याही उमेदवारीच्या निमित्ताने विखे आणि लंके या दोघांच्याही भूमिका जनतेसमोर आल्या आहेत हे नक्की!
मतांचे विभाजन होण्यासाठी अपक्ष, वंचित आणि एमआयएम हे उमेदवार दिले आणि त्यांनी मते खाल्ली असे आता कोणालाच म्हणता येणार नाही. लढाई सरळसरळ होणार आहे. विखे आणि लंके या दोघांनाही आता कोणाच्याच आड लपता येणार नाही. त्यामुळेच या निवडणुकीत खरी रंगत आता सुरू झाली असल्याचे मानले जाते.
कोणी कोणी घेतली माघार पहा
परवेज उमेद शेख, गिरीष तुकाराम जाधव, डॉ. योगिता प्रविण चोळके, जहीर युसुफ जकाते, राणी नीलेश लंके, शितोळे सुदर्शन लक्ष्मण, मनोरमा दिलीप खेडकर, प्रतिक अरविंद बोरसे, प्रा. सुनिलराव मोहनराव पाखरे, नीलेश साहेबराव लंके, मुक्ता प्रदीप साळुंके यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली.
नगरमधून वंचितची माघार नाही, खेडकर यांचा अर्ज कायम
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार दिलीप कोंडीबा खेडकर यांचा अर्ज कायम असल्याने दोन्ही प्रस्थापित आमदार व खासदार यांच्या पायाखालची जमीन घसरली आहे व त्यांनी एक खोटी प्रेस नोट प्रसिद्ध करून ओबीसी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार दिलीप खेडकर यांचा अर्ज माघारी घेतल्याचे अफवा पसरवली आहे. तरी ओबीसी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री दिलीप खेडकर यांनी कुठल्याही प्रकारे अर्ज माघारी घेतलेला नसून त्यांना निवडणूक आयोगाने चहाची किटली हे चिन्ह मंजूर केलेले आहे तरी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन खेडकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.