Accident News : राज्यात दीपोत्सवाची सुरुवात झाली असतानाच धनतेरसच्या दिवशी नंदुरबार जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सातपुड्यातील अस्तंबा यात्रेवरून परत येणाऱ्या भाविकांच्या पिकअपचा चांदशैली घाटात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ६ भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून, १५ पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.
प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, पिकअपमधून २२ ते २३ भाविक प्रवास करत होते. चांदशैली घाटातील अवघड वळणावर वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप खोल दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की, काही भाविकांनी जागीच प्राण सोडले. घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना वाहनातून बाहेर काढण्यास मदत केली.
जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती अत्यवस्थ असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती स्थानिकांनी दिली.तळोदा पोलीस प्रशासनाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून, मदत आणि तपासकार्य सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरु आहे.