संगमनेर | नगर सह्याद्री-
संगमनेर नगर परिषद प्रशासनाने शहर हद्दीतील घरांच्या संकलित करात १० टक्के दरवाढ प्रस्तावित केलेली आहे. सदरची दरवाढ ही अत्यंत अन्यायकारक असून महागाई, बेरोजगारी व व्यापार मंदीच्या काळात नागरिकांना परवडणारी नाही. तरी ही केलेली दरवाढ तातडीने रद्द करावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारकडे केली असून यामुळे घरपट्टी मधील १० टक्के वाढीव दरवाढ स्थगित होऊन शहरवासीयांना दिलासा मिळणार आहे.
नागपूर येथे अधिवेशन प्रसंगी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी ही दरवाढ रद्द करण्याची मागणी केली.यावेळी आमदार थोरात म्हणाले की, संगमनेर नगर परिषद हद्दीत संकलित कर आकारणीबाबत चतुर्थ वार्षिक रिविजन पूर्ण झाली असून सन २०२३- २४ या वर्षासाठी प्राथमिक कर निर्धारण करण्यात आले आहेत. यात शहरातील घरांच्या संकलित करात दहा टक्के दरवाढ प्रस्तावित केलेली आहे.
सदरची दरवाढ ही अत्यंत अन्यायकारक असून महागाई बेरोजगारी व व्यापार मंदीच्या काळात नागरिकांना परवडणार नाही. याबाबत संगमनेर मधील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष असून ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी याकरता संगमनेर शहर काँग्रेसच्या वतीने विविध वेळा आंदोलन करत निवेदने देण्यात आले आहे.मात्र याबाबत प्रशासनाने अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. तरी सरकारने तातडीने महागाई व आर्थिक टंचाईमध्ये सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी वाढ केलेली दरवाढ तातडीने रद्द करण्याच्या सूचना द्याव्यात अशी आग्रही मागणी केली.
तर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनीही या कामी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला असून संगमनेर मधील नागरिकांना ही दहा टक्के प्रास्तावित दरवाढ परवडणारी नसून आर्थिक कुचंबना करणारी आहे .त्यामुळे त्वरित दरवाढ रद्द झाली पाहिजे यासाठी प्रशासन दरबारी पाठपुरावा केला आहे.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दिलीपराव पुंड, किशोर पवार, गजेंद्र अभंग, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, संतोष कोळपकर, प्रवीण वरपे, रवींद्र ताजणे, बाळासाहेब पवार, राजेंद्र निराळी, अरुण हिरे, ज्ञानेश्वर नाईक, सतीश मणियार, शैलेश कलंत्री, नूर मोहम्मद शेख आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.