अहमदनगर | नगर सह्याद्री- शहर सहकारी बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणात चार्टर्ड अकाऊंटंट विजय विष्णुप्रसाद मर्दा (वय ५७, रा. रिद्धीसिद्धी कॉलनी) याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मात्र, शहर बँकेच्याच दुसर्या गुन्ह्यात वर्ग करुन घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात मागणी केली. त्याला परवानगी मिळाल्याने मर्दा याला दुसर्या गुन्ह्यात वर्ग केल्याचे तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी सांगितले.
डॉ. नीलेश शेळके याच्यासह काही डॉटरांनी एकत्र येऊन नगर शहरात ’एम्स’ नावाने रुग्णालय सुरू केले होते. त्याच्या यंत्रसामुग्रीसाठी शहर बँकेकडे कर्ज प्रकरण करण्यात आले होते. मात्र यामध्ये फसवणूक झाली तसेच अपहार केल्याचे तीन गुन्हे दाखल आहेत. राहुरीच्या डॉ. रोहिणी भास्कर सिनारे, श्रीरामपूरच्या डॉ. उज्वला रवींद्र कवडे व नगरचे डॉ. विनोद अण्णासाहेब श्रीखंडे यांनी तक्रारी केल्या होत्या.
सुरुवातीला मर्दा याला सिनारे यांच्या तक्रारीनुसार दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. बुधवारी त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. आता न्यायालयाच्या परवानगीने त्याला कवडे यांच्या तक्रारीनुसार दाखल गुन्ह्यात वर्ग केले आहे.