Maharashtra Heatwave: राज्यात उन्हाचा पारा सातत्याने वाढत आहे. सोमवारपासून विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातीलअनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे. विशेषतः मुंबई शहरात अंतर्गत भागांमध्ये प्रचंड उकाडा जाणवू लागला असून नागरिक हैराण झाले आहेत. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, मुंबईच्या कुलाबा वेधशाळेने ३४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली तर सांताक्रूझ येथे तापमान ३६.८ अंशांपर्यंत पोहोचले. उपनगरांमध्ये बोरिवली, भांडुप, पवई आणि मुलुंड येथे तापमान अनुक्रमे ३८.८°C, ३८.३°C, ३८°C आणि ३७.७°C इतके नोंदवण्यात आले.
सोलापूरात सोमवारी ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, जे यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमान ठरले. सोलापूर हवामान विभागाने पुढील तीन दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. सात दिवसांपूर्वीच सोलापूरचे तापमान ४२ अंशांवर पोहोचले होते. धाराशिव जिल्ह्यात मात्र उष्णतेची लाट पुढील तीन दिवस म्हणजे १७ एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार, जिल्ह्याच्या काही भागांत तापमान ४४ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यासोबतच काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तज्ज्ञांच्या मते, मुंबई शहराची भौगोलिक रचना ही तापमानातील तफावत घडवून आणणारी ठरते. कुलाबा, नरिमन पॉइंटसारख्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागांमध्ये समुद्राच्या वाऱ्यांमुळे तापमान काहीसे नियंत्रणात राहते. मात्र, पूर्वेकडील उपनगरांमध्ये सिमेंटच्या इमारती आणि गर्दीमुळे उष्णता अडकते, त्यामुळे तापमान झपाट्याने वाढते. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाचा जोर वाढत असून नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.