अहमदनगर । नगर सहयाद्री:-
शेतकर्याने बँकेतून काढून दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली तीन लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. सावेडी उपनगरातील वसंत टेकडी परिसरात सोमवारी (२ सप्टेंबर) दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी शिवाजी लक्ष्मण तांबे (वय ६४, रा. वीर सावरकर मार्ग, वसंती टेकडी, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे सोमवारी दुपारी एकच्या सुमारास त्यांची दुचाकी (एमएच-१६-डीडी-२९६६) घेऊन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गुलमोहोर रोड शाखेत पैसे काढण्यासाठी गेले होते. बँकेच्या बाहेर मोकळ्या जागेत त्यांनी त्यांची दुचाकी पार्क केली व ते बँकेत गेले. १५ मिनिटांनी ते बँकेतून बाहेर आले व बँकेतून काढलेली तीन लाख रुपयांची रोकड दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. दुचाकी घेऊन ते घराकडे जात असताना वीर सावरकर मार्गावर महेश किराणा दुकानासमोर किराणा घेण्यासाठी थांबले.
तेथे किराणा सामान घेऊन ते घरी गेल्यानंतर दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवलेली रक्कम त्यांना दिसली नाही. त्यांनी रोकड कुठे गेली, याचा शोध घेतला परंतु त्यांना ती मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेत रोकड चोरीला गेल्याची माहिती दिली. तोफखाना पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून घटनास्थळी भेट दिली आहे. परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी पोलिसांनी केली असून संशयित चोरट्याचा शोध घेतला जात आहे.