मुंबई | नगर सह्याद्री:-
लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालेल्या महाविकास आघाडीचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मात्र सुपडासाप झाला आहे. विधानसभेतील अपयशामुळे आता महाविकास आघाडीतील नेत्यांसह आमदार, खासदारांमध्येही अस्वस्थता असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता भाजप महाविकास आघाडीला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे. कारण भाजपकडून राज्यात महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. विधानसभेतील दारुण पराभवानंतर आघाडीतील काही खासदार भाजपच्या संपर्कात असून ते लवकरच ते राजीनामा देण्याची शक्यता असल्याची माहिती भाजपच्या गोटातून समोर आली आहे.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील ऑपरेशन लोटस च्या चर्चा खऱ्या असल्याचे संकेत दिले आहेत. ऑपरेशन लोटस संदर्भात प्रश्न विचारला असता बावनकुळे म्हणाले, काँग्रेसच्या नेतृत्वाला त्यांचे निवडून आलेले खासदार सांभाळता येत नाही.शिवाय काँग्रेसमध्ये राहून पुढे काही भवितव्य नाही असं त्यांच्या खासदारांना वाटत आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाचं निवडून आलेल्या आमदार आणि खासदारांकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे काही लोक अस्वस्थ असून पुढे काय करायचं ते बघू, असं म्हणत ऑपरेशन लॉटस करण्याचे संकेत बावनकुळे यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे.
तसेच भाजप नेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडीमधील खासदार आणि आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगितले आहे. महाविकास आघाडीचे खासदार ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी आहेत, विशेषत: शरद पवार साहेबांचे खासदार जिथं आहेत तिथं महायुतीचे आमदार निवडून आले आहेत. केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार आहे. मतदारसंघात विकासकामं करणं प्राधान्याचा विषय राहणार आहे.
स्वत:चं राजकीय भविष्य, कार्यकर्त्यांचा आग्रह, ज्यासाठी निवडणूक लढवतो तो विकास अशी मानसिकता असेल तर यासाठी शरद पवार साहेबांचे खासदार अशी भूमिका घेऊ शकतात. विकास हवा असेल तर सत्तेच्या माध्यमातून गतीनं विकास करता येतो. त्यामुळं अशा प्रकारचा निर्णय होऊ शकतो. शरद पवार साहेबांचे असतील किंवा मविआचे खासदार आमच्या नेतृत्त्वाच्या संपर्कात राहण्याची शक्यता आहे, असं प्रविण दरेकर म्हणाले आहे.