मुंबई । नगर सहयाद्री:-
राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. महायुतीचा गुरुवारी शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्यात फक्त तीनच नेते शपथ घेणार असल्याचे माहिती समोर आली आहे. मुंबईतील आझाद मैदानात गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता मुख्यमंत्र्यांसह 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहे. महायुतीमधील खातवाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही, म्हणून इतर मंत्र्यांच्या शपथविधीचा निर्णय अजून झालेला नाही. तूर्तास तिघांच्या शपथविधीला दिल्लीकडून ग्रीन सिग्नल मिळला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभेचा निकाल लागून 10 दिवस उलटले तरी खातेवाटचा निर्णय झालेला नाही. सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खराब झाली. अशात सोमवारी रात्री भाजपचे संकटमोचक गिरीष महाजन त्यांच्या भेटीसाठी ठाण्याला त्यांच्या निवासस्थानी गेले. त्यानंतर मंगळवारी सकाळी एकनाथ शिंदे ज्यूपिटरला गेले तिथे चेकअपनंतर ते वर्षा बंगल्यावर परतले. त्यानंतर भेटीगाठीचं सत्र सुरु झालं. रात्री अचानक देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी आले. गेल्या काही दिवसांपासून महायुतीत काही आलबेल नाही, अशी चर्चा रंगली होती, त्याला अजून हवा मिळाली.
खरं तर गृहमंत्रीपदावरून शिवसेना आग्रही आहे. उपमुख्यमंत्रीकडेच गृहमंत्रीपद असतं, हे असं म्हणतं शिवसेना गृहमंत्रीपदावर ठाम आहे. तरदुसरीकडे भाजप गृहमंत्रीपद सोडण्यास तयार नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे लागलंय. अशातच आता एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी अस्वस्थ असल्याचं म्हटलं जात आहे. भाजप, राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या आहेत. त्यात सरकार स्थापन होत नसल्याने राष्ट्रवादीत अस्वस्थता दिसून येत आहे. महायुतीकडे बहुमत असल्यानं किमान दोन पक्षांसह मंत्रिमंडळाचा शपथविधी उरकून घ्यावा या मागणीसाठी अजित पवारांनी दिल्ली गाठलीये.
महायुतीत ज्याचे जास्त आमदार त्याला जास्त मंत्रिपदं असा फॉर्म्युला असल्याचं सांगण्यात येतंय. पण राष्ट्रवादीला हा फॉर्म्युला मान्य नाही. राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट भाजप खालोखाल असल्यानं शिवसेनेऐवढीच मंत्रिपदं राष्ट्रवादीनं मागितलीयेत. या मागणीनं शिवसेना अस्वस्थ झालीये. शपथविधीच्या तोंडावर राष्ट्रवादीनं नवा फॉर्म्युला आणल्यानं शिवसेना नाराज झालीये. त्यामुळे खातेवाटपाचा निर्णय न झाल्यामुळे गुरुवारी 5 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांसह 2 उपमुख्यमंत्री शपथ घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.