अहिल्यानगर । नगर सहयाद्री
अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध मंदीरांमधून दानपेटी आणि दागिने चोरणाऱ्या सराईत चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपींनी एकूण १५ मंदिरामध्ये चोरी केल्याची कबुली दिली असून ४ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शनिवार दि. ४ ऑक्टोबर रोजी पाथर्डी तालुक्यातील करोडी येथील श्री शनिमारुती मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी ३ लाख ५०हजार रुपयांची रोकड लांबवली होती. या घटनेची नोंद पाथर्डी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मंदिर चोऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना कारवाई आदेश दिले.
तपासादरम्यान, पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आढावा घेवुन व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती संकलित केली. दरम्यान पथकाला सदरचा गुन्हा सराईत आरोपीराहुल किशोर भालेराव (रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपुर ) व त्याचे इतर साथीदारांनी केला असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचत राहुल किशोर भालेराव ( रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपुर), रामेश्वर ज्ञानदेव धनेश्वर (रा. इंदिरानगर, भोकर ता. श्रीरामपुर ), एकनाथ नारायण माळी ( रा. ममदापुर ता. राहाता ), शत्रुघ्न मुरलीधर मोरे (रा. टाकळी मानुर, ता. पाथर्डी ) यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असत त्यांनी साथीदार राहुल भाऊसाहेब माळी (रा. राहाता, जि. अहिल्यानगर ), पांडु उर्फ दत्तु बाबासाहेब मोरे, ( रा. भोकर, ता. श्रीरामपुर) व पांडु उर्फ दत्तु बाबासाहेब मोरे याचा एक अनोळखी मित्र (फरार) यांच्यासह ७ ते ८ महिन्यांत जिल्ह्यातील १५ मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. तपासादरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी, लोणी, घारगाव, राहाता, श्रीरामपूर, एमआयडीसी, संगमनेर व कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
मुख्य आरोपी राहुल भालेराव याच्याविरुद्ध यापूर्वी दरोडा, जबरी चोरी, सरकारी कामात अडथळा, घरफोडी आदीचे १९ गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे अहिल्यानगरसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दाखल आहेत. सदर आरोपींना पाथर्डी पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक याच्या पथकातील सपोनि/हरिष भोये, पोलीस अंमलदार सुरेश माळी, गणेश लोंढे, विष्णु भागवत, फुरकान शेख, राहुल डोके, आकाश काळे, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, रोहित येमुल, प्रशांत राठोड, महादेव भांड महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांच्या पथकाने केली आहे.