चंदिगढ : माजी आमदाराच्या घरी टाकलेल्या छाप्यात पाच कोटी रोख रकमेसह सोन्याचे बिस्कीटे, अवैध परदेशी हत्यारे, काडतुसे आढळली. त्याच बरोबर काँग्रेसच्या आमदाराशी संबंधित ठिकाणीही छापेमारी सुरू आहे.
सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) गुरुवारी अवैध खाणकाम प्रकरणात हरयाणाचे काँग्रेस आमदार सुरेंद्र पंवार, इंडियन नॅशनल लोकदलाचे माजी आमदार दिलबाग सिंह आणि त्यांच्याशी संबंधित २० ठिकाणांवर छापे टाकले. पीएमएलएच्या अंतर्गत यमुनानगर, सोनीपत, मोहाली, फरिदाबाद, चंदिगढ आणि कर्नालमधील विविध ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या. केंद्रीय तपास यंत्रणेची कारवाई २४ तासांनंतरही सुरुच आहे.
ईडीमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी आमदार दिलबाग सिंह आणि त्यांच्या सहकार्यांच्या ठिकाणांवर अवैध परदेशी हत्यारे, ३०० काडतुसे, १०० पेक्षा अधिक दारुच्या बाटल्या, ५ कोटी रुपयांची रोकड, ५ किलोग्रॅम सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. देश, विदेशातील त्यांच्या अनेक मालमत्तांची माहितीही ईडीला मिळाली आहे.
सुरेंद्र पंवार सोनीपत विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. दिलबाग सिंह इंडियन नॅशनल लोकदलाचे माजी आमदार आहेत. त्यांनी यमुनानगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. सुरेंद्र पंवार यांच्या घरावर गेल्या २४ तासांपासून ईडीचे छापे सुरू आहेत.
अवैध खाणकाम आणि ई रवाना घोटाळ्याशी संबंधित माहिती त्यांच्याकडून घेण्याचे काम अधिकारी करत आहेत. काल सकाळी आठच्या सुमारास ईडीचे अधिकारी ५ गाड्यांमधून पंवार यांच्या घरी पोहोचले. त्यांच्यासोबत सीआयएसएफचे जवानदेखील सुरक्षेसाठी होते. कोर्टाच्या आदेशानंतर ईडीने या प्रकरणात एफआयआर नोंदवला. पंवार यांच्या घरात ईडीच्या अधिकार्यांना महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत.