सुपा / नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या सुपा शहरात बुधवारी आठवडे बाजारात मोबाईल चोरणारी टोळी सक्रिय झाली असून दिवसा ढवळ्या महागड्या मोबाईलवर चोरटे डल्ला मारण्यात यशस्वी झाले आहेत. या चोरांना खाकी वर्दी दाखवून आपला वचक निर्माण करण्याचे मोठे आव्हान नुतन पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांच्या समोर आहे.
ग्रामीण भागातील सुमारे वीस ते बावीस गावांची मुख्य बाजारपेठ असलेल्या सुपा शहरात दिवसेंदिवस झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे. त्यात सुपा येथील जुनी औद्योगिक वसाहत व म्हसणे फाटा येथील नवी औद्योगिक वसाहत यामुळे अधिकारी व कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. बुधवारी आठवड्यातून एक दिवस मुख्य बाजार याठिकाणी भरतो.
खासकरून सायंकाळी पाच ते सात दरम्यान कंपनीतील कामगार सुटल्यानंतर बाजारात मोठी गर्दी होते. याचाच फायदा घेऊन मोबाईल चोर काही क्षणातच खिशातील मोबाईल वर डल्ला मारतात. यापुर्वीही अनेक मोबाईल चोरीला गेले आहेत. मध्यंतरी एक मोबाईल चोर चोरी करताना पकडला होता. ग्रामस्थांनी त्याची यथेच्छ धुलाई करीत पोलिसांच्या ताब्यात दिला. त्या मोबाईल चोराला अटक होऊनही अद्याप मोबाईल चोरांवर वचक बसवण्यात पोलीसांना अपयश आले आहे.
बुधवार दि. ९ रोजी सायंकाळी साडेपाच ते साडेसहा दरम्यान भोयरे गांगर्डा येथील राजेंद्र भानुदास रसाळ हे बाजार करण्यासाठी बाजारात गेले असता वरच्या खिशात ठेवलेला मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. मोबाईल चोरी केल्यानंतर काही क्षणातच तो बंद केला गेला. यानंतरही पाच ते सहा जनांचे मोबाईल चोरीला गेले. आठ दिवसांत २१ मोबाईलवर चोरट्यांनी डल्ला मारला असून याची सर्वसामान्य नागरिकांना मोठी झळ बसली आहे.
दरम्यान नुतन पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंदयावाल्यांवर अंकुश बसविला आहे. मावळेवाडीसह परिसरात ताडी भट्टीवर कारवाई करत आपली एक नवी ओळख निर्माण केली. सुपा परीसरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात आहेत. मोटरसायकल चोरीच्या घटना देखील यापूर्वी अनेक घडल्या आहेत.
आता बाजारात मोबाईल चोरणारी टोळी सक्रिय झाली असून त्याचा बीमोड करण्यासाठी पोलीसांना कंबर कसावी लागणार आहे. वाढत्या अतिक्रमणाची देखील त्यात भर पडली असून बाजाराच्या दिवशी किमान तीन ते चार पोलीस कर्मचाऱ्यांची याठिकाणी नियुक्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
कंपनी कामगार सुटल्यानंतर सायंकाळी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. याचा फायदा घेऊन चोर मोबाईलवर हात साफ करतात. नागरिकांनी बाजारात येताना आपल्या मौल्यवान वस्तू जसे की डाग दागिने घरी किंवा सुरक्षित ठेवावे. मोबाईल हा शक्यतो खालच्या खिशात ठेवावा. मोबाईल विकत घेतल्यानंतर त्यावरील आय एम ई आय हा नंबर मोबाईल बरोबर किंवा बिलावर दिला जातो तो सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. अनेक जणांकडे फिर्याद देताना तो नंबर मिळत नाही त्यामुळे मोबाईलचा शोध घेणे अवघड जाते.
– अरूण आव्हाड, पोलीस निरीक्षक सुपा.
चौकट ओळ- रस्त्यावर भरतो बाजार
सुपा ग्रामपंचायतीने भाजी विक्रेत्यांसाठी शेडची व्यवस्था केली आहे. परंतु या शेडमध्ये जागा उपलब्ध असताना भाजी विक्रेते व इतर व्यावसायिक भर रस्त्यात आपली दुकाने थाटतात यामुळे गर्दीत अनखी भर पडते. याकडे ग्रामपंचायत जानीवपूर्वक डोळे झाक करताना दिसत आहे. ग्रामपंचायत कर घेते मग विक्रेत्यांना बसवण्याची व बाजारात शिस्त लावण्याची जबाबदारी कोणाची असा थेट सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.