Politics News: विधानसभेचे बिगुल लवकरच वाजणार असून सर्वच पक्षानी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. महायुतीमध्ये जागा वाटपावरुन रस्सीखेच सुरू आहे तर महाविकास आघाडीने आपली रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. अशातच एक मोठीये अपडेट समोर आली आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी महाराष्ट्र दौरा करणार असून दौऱ्यादरम्यान निवडणूक आयोग राजकीय पक्षासोबत बैठक देखील घेणार आहे. त्यामुळे लवकरच विधानसभेचे फटाके फुटण्याची शक्यता आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज 26 सप्टेंबरला रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी दिल्लीहून मुंबईकडे रवाना झाले आहे.
निवडणूक आयोगाचे अधिकारी २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. २७ सप्टेंबरला सकाळी १० वाजता सर्व राजकीय पक्षांसोबत बैठक होणार आहे. दुपारी १ वाजता सीईओ, नोडल अधिकाऱ्यांशी बैठक होणार आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता निमलष्करी दलाचे अधिकारी, आयकर विभाग, गुप्तचर यंत्रणा, सीबीआय, ईडी अधिकाऱ्यांबरोबर बैठक होणार आहे.
संध्याकाळी ५ वाजता मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक यांच्यासह प्रशासकीय आणि पोलिस यंत्रणेतील अधिका-यांशी महत्त्वाच्या बैठका होतील. यात राज्याच्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी किती पोषक वातावरण आहे? हे आयोग जाणून घेणार आहे. त्यानंतर 28 सप्टेबरला सकाळी साडे नऊ वाजता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांची बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता निवडणूक आयोगाचे अधिकारी पत्रकार परिषद घेणार आहे.