अहिल्यानगर | नगर सहयाद्री:-
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे भाजपचे सरकार आल्यानंतर आजारी पडले असतील, त्यामुळे ते आंदोलन करत नाही अशा शब्दात कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर साधला आहे.
आता पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारने 200 पेक्षा अधिक जागा जिंकल्या. या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निकालावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केलीये. फेरमतमोजणीची मागणीही काही उमेदवारांनी केली असून हळूहळू या निकालाला विरोध वाढताना दिसत आहे. अशातच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 95 वषय बाबा आढाव यांनी यासंदर्भातचआंदोलन सुरू केलं आहे. याचाच धागा पकडत आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला.
पुढे बोलतांना रोहित पवार म्हणाले, सध्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या सर्वच घटक पक्षाच्या अशा जागा आल्या आहेत की अजित पवार यांनी भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, तर एकनाथ शिंदे यांची चांदी आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी भाजपला अडचणी करण्याचा प्रयत्न केला तर अजित पवारांची चांदी आहे अशी सध्याची स्थिती आहे.
महायुतीचं सरकार आल्यानंतर आता पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करणार असल्याची चर्चा आहे. बाबा आढाव यांच्यासारखे खरे सामाजिक कार्यकर्ते लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन करत आहेत. मात्र दुसरीकडे भाजपचे सरकार आल्यानं जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आंदोलन करत नाहीत. ते आजारी असतील त्यामुळे आराम करत असतील असा खोचक टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे.