अहमदनगर / नगर सह्याद्री : नगर तालुक्यातील देहरे येथील एका मुलीवर अत्याचार करून खून केल्याची घटना नुकतीच घडली होती. यातील नराधमांचा तात्काळ शोध घेऊन आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी देहरे येथे सकल सर्व समाजाच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. आज या नराधमांनी चिमुकलीचा जीव घेतला, आणखी कुणावर अशी वेळ येण्याआधीच या नराधमांना पकडून फाशी द्या अशी मागणी करण्यात आली. देहरे येथील काही नराधमांनी या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तीचा निघृण खून केला.
आरोपी गुंड असून त्यांची गावात दहशत असल्याने कोणीही पुढे येण्यास तयार नाहीत. काही प्रत्यक्ष साक्षीदारही आहेत. त्यांना धमकवण्याचा प्रकार आरोपी तसेच त्यांच्या नातेवाईक यांच्याकडून होत आहेत असा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला.
निकाल लागेपर्यंत पीडितेच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण मिळावे आणि हे प्रकरण सीआयडी कडे वर्ग करण्यात यावे. तसेच या गुन्ह्याचे कामकाज फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या.