शिर्डी / नगर सह्याद्री : उद्धव ठाकरे यांचे राज्यातील दौरे ही केवळ नौटंकी आहे. मुख्यमंत्री असतानाही कोकणातील जनतेच्या तोंडाला त्यांनी पाने पुसली होती. पक्ष आणि आमदारही गमावलेल्यांकडे आता फक्त व्यक्तिव्देशाची भाषणं शिल्लक आहेत. रोज सकाळी उठून बोलण्याचा संजय राऊतांचा वारसा आता उध्दव ठाकरेंनी स्विकारला असल्याची टिका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
मंत्री विखे पाटील यांनी लोणी येथे आपल्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबाराच्या निमित्ताने नागरिकांच्या भेटी घेत त्यांचे प्रश्न जाणून घेतले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, यापूर्वीही उद्धव ठाकरे यांनी कोकणाचे दौरे केले. परंतू तेथील जनतेला ते काही देवू शकले नाहीत. आताही ते व्यक्तिद्वेषाच्या भाषणांपलीकडे काहीही देऊ शकणार नाही. ते सत्ता गेल्याच्या वैफल्याने ते ग्रासले आहेत असे विखे म्हणाले.
देशामध्ये इंडिया आघाडीकडे नेतृत्व करायला एकही नेता आता शिल्लक नाही. प्रत्येकजण आता वेगळी भूमिका घेवून इंडिया आघाडीतून बाहेर पडू लागला आहे. इंडिया आघाडीने कितीही प्रयत्न केले तरी, देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. वेगवेगळ्या राज्यात इंडिया आघाडीतील नेत्यांमध्येच मतप्रवाह उघड झाले असल्याने त्याची काळजी आघाडीच्या नेत्यांनी करावी असा सल्ला मंत्री विखे पाटील यांनी दिला आहे.