संगमनेर। नगर सहयाद्री-
नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात भर लग्न सोहळ्यात आनंदाच्या क्षणी दुःखाचा डोगंर कोसळल्याची बातमी समोर आली आहे. बेधुंद झालेल्या डीजे वाहनाच्या चालकाच्या धक्कादायक कृत्याने वरातच हादरली आहे.
लग्न सोहळ्यात नवरदेवाच्या निघालेल्या मिरवणुकीत बेधुंद झालेल्या डीजे वाहन चालकाने अचानक वेग वाढवल्याने त्याखाली मिरवणुकीतील लोक चिरडल्याची घटना गुरुवारी घडली. या दुर्दैवी घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.घटनेनंतर डिजे वाहन चालक फरार झाला आहे.
बाळासाहेब हरिभाऊ खताळ (वय ३५, रा. धांदरफळ खुर्द), भास्कर राधु खताळ (वय ६८, रा. धांदरफळ खुर्द, ता. संगमनेर) अशी मयतांची नावे आहेत. तर रंगनाब दशरथ काळे, अभिजित संतोष ठोंबरे, राजेंद्र भाऊराव कचरे, गोरक्ष पाटीलबा खताळ, सोपान रावबा खताळ, बाळकृष्ण तुकाराम खताळ (सर्व रा. धांदरफळ खुर्द) हे जखमी झाले आहेत. जखमींवर संगमनेरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.