अहमदनगर । नगर सहयाद्री
तीन लाख रूपयांच्या व्याजापोटी 15 लाख रूपयांची मागणी करणार्या सावकाराच्या जाचाला कंटाळून एक तरूण घर सोडून निघून गेल्याची घटना समोर आली आहे. त्या तरूणाच्या पत्नीने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नगरमधील दोन सावकारांविरूध्द महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
वर्षा नीलेश खताळ (वय 38 रा. मारूती मंदिराचे जवळ, भोसले आखाडा) यांच्या फिर्यादीवरून दिलीप झिंझुर्डे, प्रशांत झिंझुर्डे (दोघे रा. मारूती मंदिराचे जवळ, भोसले आखाडा) यांच्याविरूध्द सोमवारी (15 जुलै) गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी वर्षा यांचे पती नीलेश यांना सन 2019 मध्ये दिलीप झिंझुर्डे याने सावकारकीचा परवाना नसताना 10 टक्के व्याजदराने तीन लाख रूपये दिले होते.
त्या पैशांच्या मोबदल्यात नीलेश यांनी वेळोवेळी एक वर्ष व्याज दिले. परंतू त्यानंतर करोना आल्याने लॉकडाऊन पडले. त्यामुळे नीलेश यांना व्याज देणे शक्य झाले नाही. मात्र दिलीप व प्रशांत यांनी दिलेल्या पैशाच्या व्याजाच्यापोटी 15 लाख रूपयांची मागणी करून त्यांच्यावर दबाब टाकला.
नीलेश यांच्या नावे बळजबरीने मर्चंट बँकेत खाते उघडून त्या खात्याचे पासबुक, चेकबुक त्यांनी स्वत: कडे ठेवले व नीलेश यांच्याकडून अवैधरित्या व्याज घेऊन व व्याज देण्यास भाग पाडले.दरम्यान, दिलीप व प्रशांत यांच्या अवैध सावकारीच्या जाचाला कंटाळून नीलेश खताळ घरातून निघून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहायक फौजदार गिरीषकुमार केदार करत आहेत.