अहमदनगर / नगर सह्याद्री सध्या महाराष्ट्रात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. महाराष्ट्रात सध्या महायुतीचे सरकार आहे. २०१९ मध्ये झालेला महाविकास आघाडीचा प्रयोग सर्वश्रुत आहे. या आघाडीमुळे काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी सत्तेत आली व जास्त आमदार असूनही भाजपला विरोधात बसावे लागले.
परंतु अडीच वर्षानंतर शिवसेनेत झालेलं बंड व त्यानंतर फुटलेली राष्ट्रवादी यामुळे महायुतीचे सरकार आले. आता पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणूक तोंडावर आल्या आहेत. यामध्ये कुणाला जागा मिळतील व कुणाचे सरकार येईल हे येणारा काळ सांगेलच. परंतु जे काही सर्व्हे येत आहेत यामध्ये अनेक सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला चांगले दिवस असतील असं म्हटलं आहे, तर काहींमध्ये भाजपच्या बाजूनेही कल आहे. जर महाविकास आघाडीचे सरकार आले तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात हे मुख्यंमत्री अशीच सध्या जनमानसात चर्चा आहे.
* एकनिष्ठ नेता
आ. बाळासाहेब थोरात हे सलग आठ वेळेस विधानसभेवर निवडून आले आहेत. संगमनेर हा त्यांचा हक्काचा मतदार संघ मानला जातो. सध्याची राजकीय स्थिती पाहिली तर महाराष्ट्रात अनेक नेते पक्ष बदलताना दिसतात. काँग्रेसमधूनही अनेक नेते इतर पक्षात गेलेले दिसतात. परंतु आ. बाळासाहेब थोरात यांनी आजवर काँग्रेसशी एक निष्ठता ठेवली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही सर्वांचाच स्वच्छ आहे. त्यामुळे त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो यात शंका नाही.
* मवाळ व स्वच्छ नेता
आ. थोरात यांच्याकडे मवाळ नेते म्हणून पाहिले जाते. ते कधी आक्रमक होताना किंवा जास्त विरोधात जाताना दिसत नाहीत. त्यामुळे सर्वच पक्षांतील बहुतांशी नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. तसेच त्यांच्यावर कसलाही भ्रष्ट्राचाराचा मोठा आरोप झालेला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिमाही स्वच्छ नेता अशी आहे. त्यामुळे ही एक त्यांची जमेची बाजू आहे.
* २०१९ मध्ये मोठी भूमिका
महाराष्ट्राच्या विधिमंडळातील ते सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. तसेच त्यांनी आजवर महाराष्ट्रात अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. २०१९ मध्ये महाराष्ट्रात काँग्रेसची कशी स्थिती होती व त्यामध्ये थोरात यांनी काँग्रेससाठी केलेली पळापळ, कष्ट सर्वश्रुत आहेत. अगदी कठीण परिस्थतीमध्ये लढा देत, सर्व चातुर्य,मुत्सद्देगिरी, कष्ट, चिकाटी सर्व पणाला लावून काँग्रेससाठी महाराष्ट्रात अच्छे दिन आणले असे काँग्रेस कार्यकर्ते म्हणतात. त्यामुळे पक्षसाठी असणारे त्यांचे कार्य व इतर काही गोष्टी पाहता त्यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते ही शक्यता नाकरता येत नाही.
* अहमदनगर जिल्ह्यासाठी मोठी संधी
जर महाविकास आघाडीचे सरकार आले व आ. बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली तर ही अहमदनगर जिल्ह्यासाठी मोठी संधी असेल. यातून अहमदनगर जिल्ह्याचा विकास अनेक पटींनी वाढेल यात शंका नाही.
- .. तरीही मुख्यमंत्रीपद नगरकडेच?
सध्या भाजपमध्ये पाहिलं तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील शर्यतीमध्ये असतील असे म्हटले जात आहे. महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यास मंत्री विखे पाटील यांच्याही गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडू शकते असे कार्यकर्ते म्हणतायेत. म्हणजे जर भाजप सरकार आले व विखे पाटील मुख्यमंत्री झाले तर ती देखील अहमदनगर जिल्ह्यासाठी मोठी संधी असेल यात शंका नाही.