अहमदनगर / नगर सह्याद्री : (MLA Rohit Pawar ED Chaukshi) राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांना ईडीकडून चौकशीअंती बोलावले आहे. ते २४ जानेवारीला चौकशी साठी जाणार आहेत. दरम्यान आता यावर एक पोस्ट सोशल मीडिया एक्स वर त्यांनी टाकले आहे.
यात त्यांनी भावनिक साद घातल्याचे दिसते. या चौकशीच्यावेळी आपल्यासोबत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे याही येणार असल्याचे आ. पवार यांनी सांगितलं आहे. सर्वच यंत्रणांवर केंद्र सरकारचा प्रचंड दबाव असल्याने याच दबावाखाली माझ्याबाबत ईडीने काही चुकीची कारवाई केली तर कुणीही घाबरून जाऊ नये, पवार यांच्यासोबत ठामपणे राहावे, असे आवाहन रोहित पवार यांनी पोस्टमधून केले आहे.
* काय म्हटलं आहे या पोस्टमध्ये
ED कार्यालयात उद्या (बुधवार दि. २४ जानेवारी) चौकशीसाठी गेल्यानंतर यापूर्वी जसं सहकार्य केलं तसंच आताही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करणार आहे. मात्र सध्याचं सुडाचं राजकारण बघता सर्वच यंत्रणांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याने याच दबावाखाली माझ्याबाबत ED ने काही चुकीची कारवाई केली तर कुणीही घाबरून जाऊ नये उलट आदरणीय पवार साहेबांसोबत आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणाऱ्या व संविधानावर विश्वास असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत सर्वांनी एकजुटीने उभं रहावं. कारण आपल्याला कुणापुढंही न झुकता महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा टिकवायचाय आणि महाराष्ट्र धर्म जपायचाय!
माझ्या कुटुंबासाठी आणि कोवळ्या वयातील मुलांसाठी तर हे घाणेरडं राजकारण न समजण्याच्या पलीकडचं आहे. पण तरीही सर्वजण खंबीरपणे माझ्यासोबत आहेत. शिवाय उद्या खा. सुप्रियाताई आणि स्वतः आदरणीय पवार साहेबही येत आहेत. वय झालं म्हणून काय झालं? वय झालेली माणसं तरुणांना संधीही देतात आणि प्रसंगी बाप माणूस म्हणून ढाल बनून उभीही राहतात. माझ्यासाठी तर हे भारावणारं आहे. या वयातही महाराष्ट्राचा हा सह्याद्री कणखरपणे पाठीशी उभा राहत असेल तर आणखी काय हवंय ! असे ते म्हणाले.