पारनेर : पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या निवडणुकीत १७ पैकी ११ संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित ६ जागांसाठी ११ फेब्रुवारीला मतदान होईल. १२ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या १७ संचालकासाठी जानेवारीत निवडणूक जाहीर झाली. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ११ संचालकांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी गुरुवारी दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके सैनिक बँकेमध्ये तळ ठोकून होते.
विद्यमान अध्यक्ष शिवाजीराव व्यवहारे यांच्यासह कारभारी पोटघन मेजर व बाळासाहेब नरसाळे यांच्यामध्ये समझोता करत १७ पैकी ११ जागा बिनविरोध निवडणूक करण्यात यश आले. उर्वरित सहा जागेवर तोडगा न निघाल्याने निवडणूक रंगतदार होणार आहे.
सर्वसाधारण प्रवर्गातील १२ जागापैकी ९ जागा बिनविरोध झाल्या. यात कारभारी पोटघन मेजर, माजी संचालक संतोष गंधाडे, संजय तरटे, शिवाजी सुकाळे, संतोष मापारी, जयसिंग मापारी, अशोक खोसे, बाळासाहेब नरसाळे, धर्माजी मते यांना संधी मिळाली. महिला राखीव मतदारसंघात अनिता भाऊसाहेब भोगाडे, लीलावती गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. सहा जागांसाठी मतदान होणार असल्याने सभासदांचा भाव मात्र आता वाढणार आहे.