अहमदनगर | नगर सह्याद्री
शहर व उपनगरातील अनधिकृत होडिर्र्ंग्जवर महापालिका प्रशासनाने हातोडा टाकण्यास सुरुवात केली आहे. घाटकोपर परिसरात होडिर्र्ंग्ज कोसळून तब्बल १७ जणांचा बळी गेला होता. या दुर्घटनेमुळे राज्यातील प्रशासनाला खडबडून जाग आली.
महापालिकेचे प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी शहरातील अनधिकृत होर्डिंग्जचा सर्वे करण्याचे आदेश दिले होते. शहर व उपनगर परिसरात महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ३८४ परवानाधारक होर्डिंग्जसह तब्बल ८३ अनधिकृत होर्डिंग्ज आढळून आले आहेत. तसेच, ४४ होर्डिंग्जचा परवाना संपुष्टात आलेला आहे. या सर्व होर्डिंग्ज मालकांना तत्काळ नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. येत्या सोमवारपासून अनधिकृत होर्डिंग्ज उतरवण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी दिली होती.
सावेडी प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत ३८, माळीवाडा (शहर) कार्यालयाच्या हद्दीत १५, झेंडीगेट २१ व बुरुडगाव कार्यालयाच्या हद्दीत ९ असे ८३ अनधिकृत होर्डिंग्ज आढळून आले. तसेच, परवाना संपुष्टात आलेले ४४ होर्डिंग्ज असल्याचे तपासणीत समोर आले आहे.
या सर्वांना तत्काळ होर्डिंग्ज काढून घेण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. अनधिकृत होर्डिंग्ज न काढलेल्या ठिकाणी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने मंगळवारपासून कारवाई करण्यात सुरुवात केली आहे. लेरा ब्रुस मैदानाजवळील अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्यात आले. यावेळी प्रभाग समिती दोन चे कर्मचारी, अतिक्रमण हटाव पथक उपस्थित होते.