अहमदनगर / नगर सह्याद्री : मध्यरात्री तरूणाला मारहाण करणार्या कोयता गँगला कोतवाली पोलिसांच्या गस्ती पथकाने पकडले. तरूणाने फिर्याद न दिल्याने पोलिसांनी स्वत: फिर्यादी होत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चौघांना पकडले असून त्यांच्याकडून स्कॉर्पिओ व चार कोयते असा सात लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अंमलदार अविनाश वाकचौरे यांनी फिर्याद दिली आहे. किरण बापू जरे (वय २३ रा. काटवन खंडोबा), नितीन मारूती जायभाय (वय २२ रा. त्रिमूर्ती चौक, सारसनगर), सोमनाथ ब्रम्हदेव वायभासे (वय १९), स्वप्नील विठ्ठल वारे (वय १९ दोघे रा. सारसनगर) यांना पकडले असून त्यांचे साथीदार पवन दीपक पवार व आकाश दिवटे (दोघे रा. नालेगाव) पसार आहेत.
शनिवारी (दि. ३) पहाटे शुभम संजय आरक (रा. आनंदऋषी हॉस्पिटलजवळ) यांना सक्कर चौक येथे स्कॉर्पिओ वाहनातील सहा जणांनी मारहाण करून त्यांच्याकडील मोबाईल व रोकड काढून घेतली होती. तशी तक्रार देण्यासाठी आरक हे कोतवाली पोलीस ठाण्यात आले होते.
त्यांनी पहाटे तक्रार न देता दुसर्या दिवशी रविवारी (दि. ४) तक्रार देण्यासाठी येतो, असे पोलिसांना सांगितले होते. पोलिसांच्या रात्र गस्त पथकाला माहिती मिळताच त्यांनी सक्कर चौकात धाव घेत किरण बापू जरे, नितीन मारूती जायभाय, सोमनाथ ब्रम्हदेव वायभासे, स्वप्नील विठ्ठल वारे यांना पकडले. त्यांच्या ताब्यातून स्कॉर्पिओ व चार कोयते जप्त केले.
दरम्यान तक्रारदार आरक व मारहाण करणारे यांच्यातील वाद आपसात समझोता करून मिटल्याने पोलीस अंमलदार वाकचौरे यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.